महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांचा शब्द आम्ही पडू देणार नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यामागे ठाम उभे राहून त्यांना निवडून आणणारच; परंतु संपत आलेल्या पक्षाचे (उबाठा) नेते भास्कर जाधव यांनी राज ठाकरेंना वाट्टेल ते बडबडू नका. आमच्या वाटेला गेलात तर बैठकांमध्ये तमाशा करायला वेळ लागणार नाही, असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला. रत्नागिरीतील विवेक हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी सरचिटणीस वैभव खेडेकर, रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, रत्नागिरी विधानसभा अध्यक्ष सुनील साळवी, तालुकाध्यक्ष रूपेश जाधव, शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, सहसंपर्क अध्यक्ष मनीष पाथरे उपस्थित होते. जाधव म्हणाले, पाडव्याला झालेल्या शिवतिर्थावरील विराट बैठकीमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. साहेबांचा शब्द म्हणजे शब्द. आम्ही रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभेत महायुतीचे वचन पाळू. उद्धव ठाकरे, विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांना तेवढ्याच ताकदीने उत्तर देऊ. राणेंच्यामागे पूर्ण ताकदीने उभे राहू.
आम्ही पक्षआदेशावर जगणारी माणसे आहोत. महायुतीमध्ये आम्हाला मानसन्मानाने बोलावले आहे. आमदार भास्कर जाधव यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, राज्यात त्यांचा एक उमेदवार निवडून येईल, अशी स्थिती आहे; पण आमच्या वाटेला गेलात तर सोडणार नाही. वारंवार राज ठाकरेंबद्दल बडबडू नका. आम्ही तुमचे किंवा तुमच्या पक्षाचे अगर उद्धव ठाकरे यांचे नाव पण घेत नाही; परंतू आमच्या वाटेला गेलात तर तुमच्या बैठकांमध्ये तमाशा करायला वेळ लागणार नाही. संपलेल्या पक्षाचे पुढारी म्हणून तुम्ही मिरवताय मग शिवतिर्थावर मनसेसारखी विराट सभा घेऊन दाखवा.