रत्नागिरी जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून मंडणगड तालुका सर्वज्ञात आहे. काल मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ या ठिकाणी खांद्यावर बंदूक घेऊन फिरताना एक अतिरेकी पाहिल्याचे वृत्त समजल्यावर एकच खळबळ उडाली. त्याशिवाय येथील स्थानिक ग्रामस्थांनी हत्यारबंद पेटी भरलेली बोट म्हाप्रळ पूलाखालून गेल्याचेही पाहिले असल्याने सर्वत्र भीतीचे सावट निर्माण झाल्याने, सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रविवारी रात्री उशिरा, म्हाप्रळ या ठिकाणी सावित्री खाडी पात्रामध्ये सशस्त्र अतिरेकी पाहिल्याच्या पसरलेल्या वृत्तामुळे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा चांगलीच हाय अलर्टवर दिसून आली. ही माहिती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षकांसह, मंडणगड पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. खाडीलागतेचे गावातील अंतर्गत तपासणी नाके, सागरी सुरक्षा सीमा दलांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रात्रीनंतर या संदर्भातील घडामोडींना वेग आल्याचे दिसून आले.
हत्यारबंद नऊ माणसांनी भरलेली बोट म्हाप्रळ आंबेत पूलाखालून खाडीमार्गे पास झाल्याची माहीती पोलिस दलापर्यंत पोहचल्याने सागरी सुरक्षेच्या दृष्टीने या वृतामधील सत्य-असत्यता पडताळण्यासाठी पोलिस दल कार्यरत झाले दिसून आले. तालुक्यातील चेक नाक्यासह सागरी सिमांवरही बंदोबस्त ठेवण्यात आला. त्याचप्रमाणे काही संशयितांना देखील ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. मात्र अशा प्रकारे सशस्त्र माणसांनी भरलेली कोणतीही बोट अद्याप तरी पोलिस दलाला मिळाली नसून, खबरदारी म्हणून जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणा दक्ष झाली आहे. संपूर्ण खाडी परिसर पोलिसांनी पिंजून काढला. खाडी लगतच्या गावांमध्ये चौकशी सुरु केली. रस्त्यांवर चेक नाके उभारून वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणी मध्ये अतिरेकी आल्याचा कोणताच पुरावा पोलिसांना सापडला नाही.