26 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeDapoliवृक्षतोडीमुळे बनतोय मंडणगड भकास...

वृक्षतोडीमुळे बनतोय मंडणगड भकास…

यावर्षी उन्हाळ्यात तापमान सातत्याने ४० अंशाच्यावर पोहचले.

निसर्गसंपन्न मंडणगड तालुक्यात गेल्या दशकात विविध कारणांनी करण्यात आलेली भरमसाट वृक्षतोड तालुक्यातील पर्यावरणाच्या मुळावर उठली आहे. तालुक्याचे नैसर्गिक वातावरण उद्ध्वस्ताकडे जात आहे. यामुळे तिन्ही ऋतुचक्रात झालेले बिघाड तालुकावासीय सध्या अनुभवत आहेत. स्थानिक प्रजातीचे शिवण, किंजळ, आईन, आपटा, शेवर, खैर आदी वृक्षांची मानवी वापरासाठी कत्तल करण्यात आल्याने वन्यजीवन विस्कळीत झाले, त्याचा थेट परिणाम घटत चाललेल्या शेतीवर झाला आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी किंवा दुष्काळ यांच्या अनुभवासह गेल्या पाच वर्षांत सरासरी तापमानात सातत्याने वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यावर्षी उन्हाळ्यात तापमान सातत्याने ४० अंशाच्यावर पोहचले. यास ग्लोबल वार्मिंगइतकीच झाडांची तोड कारणीभूत असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे. तालुक्याच्या अर्थकारणास गती देणाऱ्या आर्थिक क्रियांमध्ये जंगले व त्यावर आधारित व्यवसायांचा समावेश होतो.

आल्हाददायक वातावरणासाठी मंडणगड प्रसिद्ध असल्याने महानगरांमधून सेकंड होमसाठी मोठी गुंतवणूक गेल्या दोन दशकात झाली आहे. आजही जमीन खरेदी व विक्रीचे मोठे व्यवहार तालुक्यात सुरू आहेत; मात्र विकासाच्या गतीने बदलत जाणाऱ्या या प्रक्रियेत तालुक्याची पर्यावरणस्नेही ही ओळख हरवून गेली आहे. सामान्य शेतकऱ्यास आर्थिक मिळकतीचा कुठलाही स्रोत नाही, असे कारण पुढे करत वनविभागाच्या प्रचलित कायद्यामध्ये संबंधितांनी वेळोवेळी पळवाटा शोधल्या. चार दशकात कुठल्याही कारणांनी जंगलतोड थांबलेली नाही.

वनविभागाकडे नाही साप पकडण्याचा अनुभव – लागवड व तोडीची आकडेवारी देण्यास टाळणाऱ्या येथील वनाधिकारी व कर्मचारी हे वरिष्ठ कार्यालय व जाहीर कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. नागरिकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही. दोन इमारतीत विषारी साप शिरल्याने शहरात भीतीचे वातावरण असताना येथील कर्मचाऱ्यांकडे सापांना पकडून सुरक्षित अधिवास सोडण्याचा अनुभव नाही. त्यामुळे साहित्य उपलब्ध असतानाही परिस्थिती जैसे थे आहे. एका जिल्हा परिषद शाळेत नाग शिरलेला असताना संबंधित शिक्षकांनी वनविभागाकडे संपर्क साधला असता कर्मचारी रजेवर असल्याचे सांगितले.

बंदीकाळातही विनापरवाना तोड – लाकूड कटाईच्या गेल्या दशकात वनविभागाकडून परवानगी मिळवलेल्या तोडीच्या कितीतरी अधिक तोड वनाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने होत असल्याचा संशय व्यक्त झाला. पावसाळ्यातील बंदीकाळातही तालुक्यात विनापरवाना तोड राजरोसपणे आजही सुरू आहे. या संदर्भातील नागरिकांच्या तक्रारीकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे.

वृक्षलागवडीची आकडेवारी पुढे आली नाही – पर्यावरण रक्षणाची जबाबदारी असलेला वनविभाग आजही आपल्या कर्तव्यात कसूर करताना दिसतो. तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्षकटाई होताना सहज निदर्शनात येते. वृक्षतोडीचे परवाने देत असताना वृक्षलागवडीचे उद्दिष्टही निर्धारित करण्याची तरतूद असतानाही तोडीनंतर लागवडी व जतन यांची जबाबदारी असली तरी वनविभागाने लागवडीचे कर्तव्यात मोठी कसूर केल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळला, हे वास्तव आता कोणीही नाकारू शकत नाही. वृक्षतोडीच्या समोर केलेल्या लागवडीची कोणतीही आकडेवारी सार्वजनिक झालेली नाही.

१२ गावांना स्थलांतराच्या नोटिसा – तालुक्याची डोंगराळ संरचना लक्षात घेता डोंगरउतारावरील झाडांची तोड झाल्याने जमिनीची धूप झाली व भूस्खलन धोका अनेक ठिकाणी निर्माण झाला आहे. यंदा तालुक्यातील बाराहून अधिक गावातील नागरिकांना पावसाळ्यात सुरक्षितस्थळी स्थलांतरांच्या नोटिसा महसूल विभागाने दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular