जिल्ह्यात विविध प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार हल्ली कानावर येत आहेत. काही ठिकाणी ऑनलाईन फसवणूक होते तर काही ठिकाणी तोतयेगिरी करून फसवणूक केली जाते. मंडणगड आगाराचे व्यवस्थापक हनुमंत फडतरे यांना आपण शासकीय महसूल अधिकारी असल्याचे सांगून धमकावणाऱ्या आरोपीला पकडण्यात मंडणगड पोलिसांना यश आले आहे.
घडलेली घटना अशी कि, हनुमंत फडतरे यांनी मंडणगड पोलीस स्थानकात ३० डिसेंबर २०२१ रोजी दिलेल्या लेखी तक्रारी अर्जातील माहितीनुसार, ३० डिसेंबर रोजी आरोपी विनोद भोजू राठोड हा सकाळी ११ च्या सुमारास मंडणगड आगारात दाखल झाला. त्याने आगार व्यवस्थापकांची भेट घेतली, आणि आपली खोटी ओळख सांगून, मी दापोली येथील महसूल अधिकारी असून मंडणगड आगाराच्या चौकशीसाठी आलो असल्याचे सांगितले. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु असल्याने, त्या प्रकरणाला हाताशी धरून आगारातील किती कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे याची विचारणा केली. ही माहिती विचारत केलेली कारवाई ही चुकीची असून आगाराचा व विभाग नियंत्रकांचा अहवाल मी तत्काळ जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणार असल्याचे सांगितले.
परंतु, आगार व्यवस्थापकांना या व्यक्तीचा काही प्रमाणात संशय आल्याने त्यांनी आरोपीकडे त्याच्या शासकीय ओळखपत्राची मागणी केली. परंतु, त्याने ते देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यावरील संशय अधिकच बळावल्याने आगार व्यवस्थापकांनी मंडणगड पोलिसांशी संपर्क साधून सदरची घटना त्यांच्या कानावर घातली. त्या तोतया अधिकाऱ्याच्या विरोधात रितसर तक्रार दाखल केली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मंडणगड पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आल्याने पोलिसांनी या तोतयेगिरी करणाऱ्या इसमास ताब्यात घेतले, आणि न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.