घरगुती गॅसधारकाला ओटीपी क्रमांकाशिवाय रीफिल सिलिंडर देऊ नये, असे आदेश असल्यामुळे पालीसारख्या ग्रामीण भागातील गॅस ग्राहक ऐन दिवाळीच्या तोंडावर अडचणीत आले आहेत. ग्रामीण भागातील अनेक गावात मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्यामुळे ओटीपी वेळेवर येत नाही. त्यामुळे गैरसोय होत आहे. गॅस सिलिंडर बुक करूनही पंधरा-पंधरा दिवस ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. सिलिंडरचा पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. पाली परिसरात राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. भूमिगत टाकलेल्या ओएफसी केबल तुटून वारंवार मोबाईल नेटवर्क बंद पडत आहेत. तसेच या परिसरात गेले पंधरा दिवस दुपारनंतर विजांच्या कडकटासह जोरात पाऊस होत असल्याने मोबाईल नेटवर्क बंद असते. त्याचशिवाय साठरेबांबर, वळके, पाथरट, खानू, कशेळी, सरफरेवाडी, कापडगाव, नागलेवाडी या भागात अद्यापही सर्वच मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क उपलब्ध नाही.
या गावातील ग्राहकांना नेटवर्कअभावी ओटीपी वेळेत येत नाही. हे ग्राहक नेटवर्कमध्ये येऊन गॅस बुकिंग करतात. त्या वेळी पेट्रोलियम कंपन्यांच्या सव्र्व्हरला तांत्रिक बिघाड असल्यामुळे अनेकदा ओटीपी प्राप्त होत नाहीत. त्यामुळे दुहेरी कात्रीत ग्राहक सापडलेले आहेत. त्यांना सिलेंडर मिळण्यास अडचणी होत आहेत. त्यामुळे शासनाने व लोकप्रतिनिधींनी किमान काही महिने तरी संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्राहकाला ओटीपीशिवाय सिलेंडर द्यावेत, अशा सूचना सचिवालयाकडून देण्यात आल्या आहेत.
दिवाळीत अट शिथिल करा – शासनाने व लोकप्रतिनधींनी काही महिने संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्राहकाला ओटीपीशिवाय सिलिंडर यावेत, या धर्तीवर पाली परिसरातील ओटीपीची अट किमान दिवाळी सणासाठी शिथिल करावी, अशी मागणी केली जात आहे.