मंगळागौरीच्या परंपरेचे संवर्धन व्हावे, महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच नव्या पिढीला त्याचे आदानप्रदान व्हावे, या उद्देशाने खेळ व गाण्यांच्या माध्यमातून सर्व स्तरातील महिलांनी एका छताखाली आणण्यासाठी आयोजित मंगळागौर स्पर्धा उत्साहात झाली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून उदय सामंत फाउंडेशन, शिवसेना शहर महिला आघाडीच्या वतीने रविवारी (ता. २०) ही स्पर्धा हॉटेल विवेकच्या बँक्वेटमध्ये झाली. श्री आज्ञेश्वर महालक्ष्मी महिला मंडळाने गणेशवंदना सादर केले. स्पर्धेत ७ ते २० वयोगटातील ५ संघ, २१ ते ५० वयोगटातील २० संघ, ५० वयोगटापुढील २ संघ असे एकूण २७ महिलांचे संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेचे परीक्षण मिताली भिडे व श्वेता जोगळेकर यांनी केले. माहेर संस्थेच्या मुली व महिला यांनीही कार्यक्रमात कलेचे विशेष सादरीकरण केले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी स्मितल पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना रत्नागिरी शहर महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, दिशा साळवी, पूजा पवार यांनी विशेष मेहनत घेतली. भविष्यात महिलांच्या अशा उपक्रमांना ३ ते ४ दिवसांचे कार्यक्रमाची रूपरेषा असणारे मोठे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, अशी मागणी महिलांनी केली.
सामंत फाउंडेशनचे उपक्रम – उदय सामंत फाउंडेशनने क्रीडा, सांस्कृतिक, ग्रंथ, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील युवक वर्गाला समोर ठेवून अल्पावधीतच कोकणात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. आतापर्यंत चरित्रकार धनंजय कीर यांच्या अनुवादित केलेल्या चरित्राचा प्रकाशन सोहळा, राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा, राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा आणि आता रत्नागिरी जिल्ह्यातील अशी एक भव्य मंगळागौर स्पर्धा यशस्वीपणे राबविली आहे. उदय सामंत फाउंडेशन तरुणांना एक मार्गदर्शक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे.