गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदलणाऱ्या थंडीच्या प्रमाणामुळे आणि सकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या दवामुळे कोकणातील हापूस आंबा बागायतदारांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. विशेषतः राजापूर तालुक्यात आंबा हंगामाच्या सुरुवातीलाच प्रतिकूल हवामानाचा फटका बसल्याने बागायतदारांची यंदाच्या चांगल्या उत्पादनाची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळा लांबणीवर पडला होता. त्यामुळे आंबा कलमांना चांगली पालवी फुटली होती. नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाचे काही प्रमाणात आगमन झाले असले, तरी त्याचा पालवीवर फारसा प्रतिकूल परिणाम झाला नाही. उलट पुढील काळात मोहोर येण्यासाठी आवश्यक अशी मजबूत आणि परिपक्व पालवी तयार झाली होती. डिसेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण वाढल्याने आंबा हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आणि बहुतांश हापूस आंबा कलमे मोहोराने बहरली. मोहोर टिकून राहावा, तसेच कीडरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बागायतदारांनी मोठ्या प्रमाणात कीटकनाशके आणि बुरशीनाशकांची सातत्याने फवारणी केली. त्यामुळे सुरुवातीला मोहोर चांगल्या प्रकारे टिकून राहिल्याचे चित्र होते; मात्र त्यानंतर अचानक हवामानात बदल होत सकाळच्या प्रहरी मोठ्या प्रमाणात दव पडू लागला.
या दवामुळे आंब्याच्या मोहोरावर विपरीत परिणाम झाला. मोहोर काळा पडू लागला आणि काही दिवसांतच मोठ्या प्रमाणात गळून गेला. मोहोरानंतर त्याचे कणीमध्ये (लहान फळधारणा) रूपांतर होणे अपेक्षित असते; मात्र यंदा अनेक बागांमध्ये फुललेला मोहोर असूनही त्यामध्ये कणी शोधावी लागत आहे. परिणामी, यावर्षी आंब्याचे उत्पादन आणि त्यातून मिळणारे उत्पन्न अपेक्षेपेक्षा खूपच कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच हा फटका बसल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा थंडी वाढल्याने नव्या मोहोराचे फुटवे दिसू लागले आहेत. काही ठिकाणी झाडांना नवीन पालवी फुटत असून, ही पालवी अधिक मजबूत (जून) होत असल्याचेही निरीक्षण आहे. मोहोर काळा पडल्याने आणि कणीचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने एकंदर चित्र निराशाजनक असले तरी नव्याने येणाऱ्या मोहोरामुळे काही प्रमाणात तरी उत्पादन मिळेल, अशी आशा बागायतदारांना वाटत आहे.
थ्रीप्स, तुडतुड्याचा प्रादुर्भाव शक्य – सकाळी मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या दवामुळे मोहोरासह झाडांच्या पानावर मोठ्या प्रमाणात चिकटा गोळा झाल्याचे दिसत आहे. त्यातून, भविष्यामध्ये हापूस आंब्यावर थ्रीप्स, तुडतुड्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बागायत-दारांकडून वर्तवली जात आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा कीटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे.

