कोकणातील मँगोपल्पला परदेशात मोठी मागणी आहे. त्यानुसार अनेक प्रक्रियादार पल्प निर्यात करतात. आता त्यात पावस येथील महिला उत्पादक शेतकरी कंपनीची भर पडली आहे. उमेदअंतर्गत स्थापन केलेल्या पावस प्रभागसंघाच्या कोकण साज महिला शेतकरी उत्पादक कंपनीत तयार होणारे मँगोपल्प युरोपसह ऑस्ट्रेलियात निर्यात होणार आहे. बायर्स-सेलर्स मीटमध्ये परदेशी आयातदारांनी मागणी नोंदवली आहे. मुंबईतील जीओट्रेड सेंटर येथे अपेडाने नेमलेल्या सीयाल एजन्सीच्या माध्यमातून मीटचे आयोजन केले होते. त्यात राज्यातील विविध उत्पादक महिला बचतगटांनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यात पावस येथील कोकण साज महिला उत्पादक शेतकरी कंपनीच्या सभासदांना निमंत्रित केले होते. त्यांनी पावस येथील कंपनीत तयार होणाऱ्या आंबापल्पविषयी माहिती दिली.
त्यांच्या स्टॉलला परदेशात निर्यात करणाऱ्या १० आणि भारतातील ४० संस्थांनी भेट दिली. त्यामध्ये युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये निर्यात करणाऱ्या व्यावसायिकांनी मँगोपल्पची माहिती घेतली. प्रक्रिया करतानाचे व्हिडिओ पाहिले तसेच मँगोची चवही चाखली. या कंपनीने बनवलेले मँगोपल्प संबंधित व्यावसायिकांना आवडले. ऑस्ट्रेलियातून पाच हजार लिटर आणि युरोपमधून सुमारे ३० हजार लिटर मँगोची मागणी आली आहे. ८५० मिलीचे पॅकेट २२० रुपये या दरांना मिळाले. भविष्यात आणखी पल्प मागवू, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. हंगामात महिलांनी एकत्र येऊन उभ्या केलेल्या कोकण साज या कंपनीने सातासमुद्रापार भरारी घेतली आहे.
तीन वर्षांत अशी घेतली झेप – उमेदअंतर्गत स्थापन केलेल्या महिलांच्या या शेतकरी उत्पादक कंपनीत ५२४ सभासद आहेत. त्या द्वारे मेर्वी येथे एकात्मिक शेतीविकास प्रकल्पांतर्गत आंबा प्रक्रिया युनिट सुरू केले. त्यात महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. तिथे १० महिला काम करतात. उमेदचे पावस प्रभाग समन्वयक परमवीर सुभाष जेजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचे कामकाज चालते. पहिल्या वर्षी मार्गदर्शन घेतले, दुसऱ्या वर्षी साडेपाच हजार किलो आंबा विकत घेऊन त्यापासून २ हजार ५६८ लिटर मँगोपल्प बनवण्यात आला. त्यानंतर साडेसहा हजार किलो आंबा खरेदी करून त्यावर केलेल्या प्रक्रियेतून ३ हजार ५०० लिटर मँगोपल्प तयार केला. २००, ५०० आणि ९५० मिलीच्या बाटल्यांमध्ये पल्प भरून तो विक्रीला ठेवला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पल्पचा दर्जा व गुणवत्ता ठेवल्यामुळे मागणी वाढत आहे, असे कंपनीच्या संचालिका रिया पवार यांनी सांगितले.