पुणे मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या विकून गाडी घेऊन रत्नागिरीत परतणाऱ्या आंबा व्यापाऱ्याला पोलिस गणवेशातील दोघांनी १ लाख १३ हजारांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुणे ते सातारा जाणाऱ्या सेवा रस्त्यावर गाडी तपासण्याच्या बहाण्याने संशयितांनी ही लूट केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अनोळखी विरुद्ध सातारा येथील खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलला आहे. काशीनाथ ओरपे (वय २७, रा. लाजूळ, रत्नागिरी) असे तक्रारदार बागायतदाराचे नाव आहे. याबद्दल पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी; प्रीतम ओरपे आणि त्यांचे मित्र सुयोग नारायण लिंगायत हे भावाच्या मालकीच्या पिकअप जीपमधून (एमएच ०८, एपी ८५३७) आंब्याच्या पेट्या भरून लाजूळहून पुण्याला गेले होते. ९ एप्रिलला रात्री साडेअकरा वाजता ते निघाले. १० एप्रिलला सकाळी ८ वाजता पुणे मार्केट गुलटेकडी येथे पोहोचले. त्यांनी भाऊ नितीन काशीनाथ ओरपे याला फोन करून बोलावून घेतले. त्याच्यासह तिघांनी आंबापेट्या मार्केटयार्ड येथील गाळ्यात ठेवल्या.
गाडी रिकामी करून चहा-नाश्ता केला. भाऊ नितीन याने यापूर्वी दिलेल्या आंबापेट्यांचे १ लाख १३ हजार रुपये पिशवीत भरून दिले. ही रक्कम क्लिनर साईडला असलेल्या सीटखाली बॉक्समध्ये ठेवली. त्यानंतर गाडी घेऊन हे दोघे रात्री साडेनऊ वाजता निघाले. गाडी कात्रज रोड, खेडशिवार, शिरवळ पास करून रात्री ११.२५ च्या पुणे ते सातारा जाणाऱ्या सर्व्हिस रोडला गाडीच्या पाठीमागून दोन अनोळखी इसम आले. हंटर बुलेट घेऊन हाताने गाडी साईटला घे, असा इशारा केला. त्यामुळे गाडी बाजूला घेऊन थांबले. आम्ही पोलिस आहोत, ओळखपत्र दाखवले. गाडीची तपासणी करायची आहे, असे सांगून दोघांना खाली उतरवून पिकअप् गाडीच्या पाठीमागे नेऊन डायरीत प्रीतम व सुयोग यांचे नाव, पत्ता लिहून घेण्याचे नाटक केले. दुसरा गाडीची तपासणी करण्यासाठी केबिनपाशी गेला. त्यावेळी आणखी एकजण इलेक्ट्रिक स्कूटी गाडी घेऊन तिथे आला आणि ते गाडीची तपासणी करू लागले.
गाडी तपासून त्यांनी तुमच्या गाडीमध्ये काही नाही, तुम्ही जाऊ शकता असे सांगितले. त्यामुळे आम्ही गाडी घेऊन निघालो. थोडे अंतर पुढे गेल्यावर प्रीतम ओरपेंच्या लक्षात आले की, आपली रक्कम ठेवली आहे का बघावी. त्याची खात्री करण्यासाठी गाडी रस्त्याच्या शेजारी घेतली आणि सीटखाली बघितले असता पैशांची कॅरीबॅग दिसली नाही. म्हणून ११२ नंबरवर कॉल केला. त्यानंतर दोन पोलिस तेथे आले. त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. गाडी तपासणीचा बहाणा करून अज्ञात व्यक्तींनी एक लाख तेरा हजार लुटून पसार झाल्याची तक्रार सातारा येथील खंडाळा पोलिस ठाण्यात दिली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सुनील शेळके अधिक तपास करत आहेत.