जंगलात चरण्यासाठी गेलेल्या म्हशीला डुक्कर समजून तिच्यावर बंदुकीचे बार टाकून तिला विकलांग करणाऱ्या दोन स्थानिक संशयित शिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून शिकार करण्यासाठी वापरण्यात आलेली विनापरवाना बंदूक आणि काडतुसे संगमेश्वर पोलिसांनी जप्त केली आहेत.
याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र रघुनाथ देसाई रा. मांजरे देसाईवाडी यांनी त्यांच्या मालकीची म्हैस गावातील शशिकांत यशवंत देसाई यांच्या म्हैशीसोबत रानात चरण्याकरिता सोडली होती. त्यांची म्हैस व शशिकांत यशवंत देसाई यांचा रेडा घरी परत न आल्याने देसाई यांनी म्हैशीचा व रेड्याचा जंगलात शोध घेतला पण कोठेही ते आढळून आले नाहीत.
२२ ऑक्टोबर २०२२ ला सायंकाळी ०७.३० वा. ते २३ ऑक्टोबर २०२२ ला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने म्हैशीच्या पुढील डाव्या पायाचे खुब्याजवळ बंदुकीने सहा बार झाडले. त्यामुळे ती जखमी होऊन ती विकलांग आणि निरूपयोगी झाली, अशी संगमेश्वर पोलिसात फिर्याद दिली होती.
प्रसाद गजानन देसाई रा. मांजरे चिंचवाडी जि. रत्नागिरी तसेच दिनेश सुरेश देसाई यांच्याकडे तसेच इतरत्र गावात संगमेश्वर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, २२ ऑक्टोबरला रानात चरण्यासाठी मांजरे कळकदेकोंड येथे गेलेली म्हैस व रेडा हे मिलिंद महादेव चरकरी व निनाद धोंडू घाणेकर दोन्ही रा. नरबे करबुडे ता. जि. रत्नागिरी यांनी टाकलेल्या बारामध्ये जखमी झाले. त्यानी म्हैशीला डुक्कर समजून २३ ऑक्टोबरला १०.३० वा. च्या दरम्याने निनाद धोंडू घाणेकर याने त्याच्या ताब्यातील विनापरवाना बंदुकीने देसाई यांच्या म्हैशीवर बंदुकीने बार टाकले.
निनाद धोंडू घाणेकर व मिलिंद महादेव चरकरी यांनी विनापरवाना बंदुकीतून बार टाकून म्हैस जखमी केल्याचे तपासात आढळले. विनापरवाना बंदूक वापरणाऱ्या आणि डुक्कर समजून म्हैशीची शिकार करणाऱ्या निनाद घाणेकर आणि मिलिंद चरकरी या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे असलेली विनापरवाना सिंगल बॅरल बंदूक, काडतुसे आणि बॅटरी जप्त केली आहे. तसेच दोघांवर संगमेश्वर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.