कोकण विभागामध्ये ई-पीक पाहणी ऍप नोंदणीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागला असून ९४ हजार ४७ शेतकऱ्यांपैकी ८७ हजार १०२ शेतकऱ्यांनी या ऍपवर नोंदणी केली आहे. उर्वरित ६ हजार ९४५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली नसल्याची माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी ड़ॉ बी.एन.पाटील यांनी दिली.
कोकणावर मागील दोन वर्षापासून येणारी नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी अनेक शेतकर्यांनी ई-पीक पाहणी ऍप नोंदणी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परीषदेमध्ये ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि पारदर्शकतेसाठी महसूल व कृषी विभागामार्पत ई-पीक पाहणी प्रकल्प मागील १५ ऑगस्ट पासून कार्यान्वीत करण्यात आला होता. जिल्ह्यातील ९४ हजार ४७ शेतकऱ्यांपैकी ८७ हजार १०२ शेतकऱ्यांनी ऍपवर नोंदणी करुन पीक पाहणीची माहीती अपलोड केली.
त्याचप्रमाणे, जिल्ह्यामध्ये २० लाख डिजीटल मोफत सात-बारा वाटप करण्यात येणार असून योजनेचा ३ लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला. उर्वरीत सात-बाराचे वितरण १५ नोव्हेंबरपर्यंत करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात शासनाच्या सुरु असणाऱ्या अनेक समाजउपयोगी शासकीय योजनांबद्दल सुद्धा त्यांनी माहिती दिली. मनरेगा अंतर्गत पार पडणाऱ्या उद्योगांची, विविध योजनांची माहीती गावागावामध्ये पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी विविध योजनांचे कँम्पचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
काही वेळेला ई-पिक योजेनेअंतर्गत होणार्या गोंधळामुळे शेतकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेऊन यंदा पिक पाहणी नोंदणीची माहिती स्वत: अपलोड केली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी यामध्ये नोंदणी माहिती नोंदवल्याने जिल्ह्याचा क्रमांक अव्वल आला आहे.