रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम सध्या जोरात चालू असून या रस्त्याच्या कामादरम्यान अनेक घरांचे रस्त्यापासून आत बाहेर जाण्याचे मार्ग बंद केल्याची तक्रार अनेक रहिवाशांनी केली असून त्यामुळे त्यांची मोठी अडचण होत आहे. या समस्येकडे तातडीने लक्ष न दिल्यास उपोषणासारखे आंदोलन करण्याचा इशारा संबंधितांनी दिला असून न्यायालयात दाद मागण्याचा विचार देखील सुरु असल्याचे काहींनी पत्रकारांना याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले. याबाबत स्थानिक समस्याग्रस्त नागरिकांनी पत्रकारांना माहिती दिली. रत्नागिरी-नागपूर रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून या रस्त्याचे काम करत असताना ठेकेदाराने रस्त्याच्या बाजूच्या घरांना कोणतीही कल्पना न देता समोरील रस्ता काही ठिकाणी उंच तर काही ठिकाणी खोल केला असून घरात जाण्यासाठी लागणारा रस्ता बंद केला आहे.
असा आरोप काही रहिवाशांनी पत्रकारांशी बोलताना केला. रस्ता खोल किंवा उंच करताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरांना बायपास रस्ता ठेवणे गरजेचे होते तसे न करता आणि रस्त्याच्या खोलीची किंवा उंचीची कोणतीही पूर्वकल्पना न देता रस्त्याचे खोदकाम केले असाही आरोप केला जातो आहे. हे काम करत असताना घरा समोरील मार्गावर भल्या मोठ्या झाडांचे बुंदे, मोठे चर मातीचे ढिगारे, भले मोठे दगड या अडचणी ठेवून घरांचे रस्ते बंद केले असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
आंदोलनाचा इशारा – या महामार्गावरील ज्या घरांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद केला आहे अशा घराना त्वरित पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी अशी यामुळे अडचण निर्माण झालेल्या रहिवाशांची मागणी आहे. ती पूर्ण न केल्यास अडचणग्रस्त नागरीक उपोषण करतील अथवा न्यायालयाचा दरवाजा ठोठवतील असा इशारा देण्यात आला आहे.
ठेकेदारांचे म्हणणे काय? – दरम्यान, समस्याग्रस्त रहिवाशांनी केलेल्या या गंभीर आरोपाविषयी संबंधित रस्त्याच्या ठेकेदाराची बाजू जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू न शकल्याने या गंभीर आरोपांबाबत ठेकेदाराची बाजू समजू शकली नाही.