रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या संरक्षणासाठी विविध उपाय योजना राबवत असते. अनेक वेळा स्थानकावर काही विपरीत घटना घडतात आणि चोर सोडून संन्याशाला फाशी अशी अवस्था निर्माण होते. प्रत्यक्षदर्शी आणि पुरावे यांच्या अभावामुळे अनेक गुन्हेगार मोकाट फिरताना दिसतात.
देशभरातील ७५६ स्थानकांपैकी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील ७९ स्थानकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. संकटकाळात प्रवाशांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी रेल्वे स्थानकातील फलाटांवर पॅनिक बटन बसवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर रेलटेलच्या मदतीने देशभरातील ७५६ रेल्वे स्थानकात अत्याधुनिक दूरदृश्य देखरेख प्रणाली म्हणजे व्हिडीओ सव्र्हिलन्स सिस्टिम कार्यरत करण्यात येणार आहे. यामध्ये गर्दीत चेहरे ओळखणारे कॅमेरे बसवण्यात येणार असून, त्यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पकडण्यास निश्चीतच मदत होणार आहे.
रेल्वे स्थानकातील फलाटावर पॅनिक बटण यंत्रणाही बसवण्यात येणार असल्याची माहिती रेलटेलकडून देण्यात आली. यात प्रत्येक फलाटावर दोन पॅनिक बटन असतील. रेलटेल’च्या मदतीने सर्व स्थानकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा कंट्रोल रूमदेखील उभारण्यात येणार आहे. सध्या तीन ते चार स्थानकांचा मिळून एक कंट्रोल रूम बनवण्यात आला आहे. त्या नियंत्रण कक्षात मोठे पडदे असतील व स्थानकातील सर्व बाजू यामध्ये स्पष्ट दिसतील अशी त्याची रचना असेल.
एखादी घटना घडल्यास याद्वारे पाहून त्वरित सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याला मदतीसाठी घटनास्थळी पोहोचता येईल किंवा तेथे पाठवता येणार आहे. नवीन प्रणाली अंतर्गत अत्याधुनिक असे ‘सीसीटीव्ही कॅमेरा’ बसवण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानकांचे प्रवेशद्वार, फलाट, पादचारी पूल, तिकीट खिडक्या, प्रतीक्षालय, मेल-एक्स्प्रेस आरक्षण खिडक्या, वाहनतळ आदी ठिकाणी कॅमेरे बसवितानाच त्यावर कंट्रोल रूममधून देखरेख ठेवण्यात येईल.