पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथील लोक ओबीसी प्रमाणपत्र घेऊन आरक्षणाचा लाभ घेत आहेत. मात्र, कोकणामध्ये परिस्थिती उलट आहे. जातींच्या नोंदीमध्ये मराठा आणि कुणबी वेगळ्या जाती आहेत. कुणबींमध्ये ५५ प्रकार आहेत. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात मराठा- कुणबी तो वेगळा आहे. कोकणात मराठा व कुणबी सरळ सरळ वेगळे आहेत. त्यामुळे इथे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकत नाही, ती तांत्रिक अडचण आहे आणि ते मिळणार नाही. यामुळे स्वतंत्र मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी चिपळूणम धील क्षत्रिय मराठा समाजाच्या कोकण विभागीय मेळाव्या प्रसंगी करतांनाच पर्याय देखील सुचवले आहेत. हा मेळावा चिपळूण शहरातील कालभैरव देवस्थान प्रांगणाच्या कै. बापू सागावकर मैदानात झाला.
मराठा समाजाच्या काही एकरात जागा होत्या. त्या गुंठ्यावर आल्या आहेत. कोकणाबद्दल बोलायचं म्हटलं तर इथल्या कोकणवासीयांनी कोकण विकून टाकायचे ठरवले की काय? असा सवाल उपस्थित केला. मराठा समाजाने मोगल निजामांशी संघर्ष करून जागा मिळवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली भूमी जपली आणि ती भूमी आपण जपली पाहिजे. मराठा समाजाचे अस्तित्व जे आहे ते फक्त राजकारणात नसून इथल्या जमिनीवर आहे. जोपर्यंत तुमच्या ताब्यामध्ये जमीन आहे, तोपर्यंत तुमचे अस्मिता आहे. ती अस्मिता टिकवायची असेल तर लँड व जॉबलेस होता कामा नये, असा मराठा समाज बांधवांना कोंढरे यांनी सल्ला दिला.
मराठा म्हणूनच आरक्षण मिळावे – ज्यांच्या सर्टिफिकेटवर पहिल्यापासून मराठा आहे आणि आजही मराठा आहे त्यांना सुद्धा मराठा म्हणूनच आरक्षण मिळणे अभिप्रेत आहे आणि ते मिळण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी आता जो राज्य मागासवर्ग सर्वेक्षण करतोय या सर्वेक्षणावर मराठा समाज बांधवांनी गंभीरपणे विचार करून त्यां प्रश्नावलीला उत्तरे द्यावीत, असे आवाहन केले. आपल्याला शेतीबरोबर इतर क्षेत्रांमध्ये प्रगतीची दालने विकसित करावी लागतील आणि ते खरं आपलं जन आंदोलन असेल. त्या जनआंदोलनाम ध्ये सध्या महाराष्ट्राने जसं आता एक वादळ पाहिलं, तशाच प्रकारजी जी गर्दी आहे ती दिशा एकमेकांना सगळ्यांनी द्यावी असे आवाहन केले.
त्यास विरोध नाही – प्रस्ताविकात सुधीरराजे भोसले यांनी सांगितले की, मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण द्या, अशी मागणी पुढे आल्यानंतर आम्ही संभ्रमात पडलो. कोकणातील मराठा समाज बांधवांना स्वतंत्र आरक्षण म्हणून मिळाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांनी आरक्षण घ्यावे त्यास आमचा विरोध नाही. सरसकट कुणबी आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही कोकणातील मराठा समाज कुठे जाणार ? असा सवाल भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.
अनेकांची उपस्थिती – यावेळी माजी मंत्री रवींद्र माने; माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद चव्हाण, प्रभाकर जाधव, आप्पा खानविलकर अजित साळवी, सुभाष जाधव, बाळा कदम, अशोक जाधव, शिवानी पवार, बळीराम शिंदे, विजयसिंह महाडिक, मधुकर दळवी, तुळशीराम पवार, रामदास राणे, स्नेहा जावकर आदी उपस्थित होते.