कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सांगितले. व्हायरल होत असलेला व्हिडिओ बंगळुरुतील एका चौकातील पुतळ्याचा असून, त्याची गुरूवारी रात्री विटंबना करण्यात आली. त्या घटनेचे मुद्दामहून चित्रिकरण करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू त्या घटनेचे तीव्र पडसाद उमटायला लागले आहेत.
बंगळुरुमध्ये समाजकंटकांनी गुरुवारी रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी बेळगावमध्ये रास्ता रोको करत मराठी भाषिक आक्रमक झाले आहेत. मराठा समाज मोठ्या संख्येने जमला असून बेळगावमधील धर्मवीर संभाजी चौकात तणाव निर्माण झाला आहे. तसेच हर्षल सुर्वे यांच्या मार्गदर्शन खाली आंदोलन करून शिवमूर्तीला अभिषेक घालण्यात आला.
त्या घटनेवर आता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या निषेध केला आहे. त्यांनी ट्विट करत कर्नाटक राज्यातील बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे ते म्हणाले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे, असेही देखील शिंदे यांनी सांगितले. बंगळुरुमधल्या गुन्हेगाराना तातडीने अटक करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे.
बेळगावात मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटक सरकारचा समज आहे, त्यांनी तो समज आपल्या मनातून काढून टाकावा. रस्त्यावरील आणि न्यायालयामधील दोन्ही लढ्यांमध्ये जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. असा सज्जड इशारा देखील शिंदे यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.