सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि प्राधान्यक्रमातील बाब मानली जाते. त्यामुळे गस्त घालून समुद्रकिनाऱ्यावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सागरी सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली आहे. मात्र, सागवे-कातळी येथे झालेली शिसे चोरीप्रकरणासह अन्य काही प्रकरणांनी समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सागरी किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी लाखो रुपये खर्चुन उभारलेली सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षारक्षकांकडून नियमित गस्त घालून या साऱ्या गोष्टींवर पायबंद राखणे अपेक्षित असते. यासाठी शासनाकडून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, तालुक्यातील सागवे-कातळी येथे झालेल्या शिसे चोरीप्रकरणाने सागरी सुरक्षारक्षक कवचाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सागरी सुरक्षारक्षक केवळ किनाऱ्यावर असतात. संशयास्पद हालचालींकडे त्यांचे कोणतेही लक्ष नसल्याचे स्पष्ट करत मच्छीमार बांधवांकडून यापूर्वी अनेकवेळा नावालाच त्याबाबत नाराजीही व्यक्त केली गेली आहे. अनेकदा परराज्यातील बोटी येऊन मासेमारी करत असतात. याची सुरक्षारक्षकांना कल्पना असते की नाही, त्याबाबतच्या नोंदी सुरक्षारक्षकांकडून संबंधित विभागाकडून कधी घेतल्या जातात की, नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सागरीसुरक्षेचे कवच अधिक मजबूत करण्यासाठी सागरी सुरक्षारक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनाकडून वेळीच योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही लोकांकडून केली जात आहे.