रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध नसल्याने, कोणत्याही मोठ्या उपचारासाठी रत्नागिरी बाहेरच जावे लागते. त्यामुळे प्रत्येक वेळी पेशंटची अवस्था कशी असेल त्यावरून त्याला स्थानिक रुग्णालयातून बाहेर मुंबई, कोल्हापूर, पुणे येथे हलविण्याचा सल्ला येथील डॉक्टरच देतात. काही वेळेला परिस्थिती गंभीर होऊन रुग्ण दगावण्याची देखील शक्यता असते.
त्यामुळे कोकण विभागात एखादे तरी सर्व सुविधांनी युक्त मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे अशी मागणी स्थानिकांनी अनेक लोक प्रतिनिधी, मंत्र्यांना केली आहे. देवरूख येथील मातृमंदिर हॉस्पिटल आता सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतरीत होणार आहे. हळबे मावशी यांनी सुरू केलेले मातृमंदिर हॉस्पिटलचे रुपडे आता पालटणार आहे. सुपर मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल रत्नागिरी, राजापूर, लांजा, चिपळूण या शहरांशी मध्यवर्ती ठिकाणी असणारे हे हॉस्पिटल ठरणार आहे. चॅरिटेबल ट्रस्टच्या धर्तीवर हे हॉस्पिटल चालवण्याचा मानस संचालकांनी व्यक्त केला आहे.
दोन वर्षात हे नवे हॉस्पिटल रूग्णसेवेसह हजर होणार आहे. येथे ओपीडी, ब्लडबँक, आयसीयु सुविधा अद्यावत ऑपरेशन थिएटर, डायलिसीस सुविधा तसेच ट्रामा केअर सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. वाढती लोकसंख्या आणि देवरूखपासून १६ कि.मी. अंतरावरून जाणारे दोन महामार्ग यामुळे देवरूख येथे ट्रामा केअर सेंटरची उभारणी होणे गरजेचे होते. ही गरज आता मातृमंदिर हॉस्पिटलच्या माध्यामातून पूर्ण करण्यात येणार आहे.
याच्या पहिल्याच टप्पा संकल्पचित्राचे अनावरण आज गुरूवार दि. ७ एप्रिल रोजी केले जाणार आहे. तसेच अद्ययावत यंत्रणेसह रूग्णसेवेला सुरूवात होणार आहे. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, विधानपरिषद आमदार कपिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.