देवरूख एस. टी. आगारातील चालकाचा प्रताप पुढे आला असून आपली ड्युटी बदलल्याच्या रागातून चालकाने चक्क सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल करून पुणे रुटला धावणारी बस नादुरूस्त असून या बसने प्रवास करू नका अन्यथा जीवाला मुकाल असे आवाहन थेट प्रवाशांनाच केल्याचे दिसते आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच एस्. टी. प्रशासनाची धावाधाव सुरू झाली. ड्युटी बदलल्याच्या रागातून चालकाने हा प्रताप केल्याचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी पत्रकारांना सांगितले असून संबंधित चालक अमित आपटे यांना तात्काळ निलंबित केले असल्याची माहिती त्यांनी दिली.
गेले २ दिवस सोशल मिडियावर देवरूख एसटी आगारातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये चालकाने देवरूख आगारातील गाड्यांची अवस्था अत्यंत बिकट असून तक्रारी करून देखील गाड्यांची दुरूस्ती होत नसल्याने चालक-वाहकांसह प्रवाशांचा अपघाती जीव जाण्याची भीती आहे आणि याला जबाबदार देवरूख एसटी आगाराचे प्रशासन आहे, असा आरोप त्या चालकाने या व्हिडीओमध्ये केल्याचे पहायला मिळते. हा व्हिडिओ व्हायरल होताच एस. टी. प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली.
या बसमधून प्रवास करू नका – या व्हिडिओमध्ये देवरुख- पुणे व देवरुख -साखरपा मार्गे अर्नाळा या एसटी बसने प्रवास करू नका, प्रवास टाळा व स्वतःचे जीव वाचवा असे या चालकाने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. या मार्गावरील एसटी बसेसबाबत अनेकदा ब्रेकडाऊनसारखे गंभीर प्रकार घडत आहेत. मात्र याकडे आगार व्यवस्थापक लक्ष देण्यास तयार नाहीत, अशा स्वरूपाचे अनेक गंभीर आरोप देखील या चालकाने व्हायरल केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून केले आहेत.
मोठ्या अपघाताची शक्यता – देवरुख- पुणे आणि देवरुख- अर्नाळा या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेस अनेकदा बिघडत असतात व त्याची तक्रार केल्यानंतर आगार व्यवस्थापक आमच्यावरतीच कारवाई करतात असा गंभीर आरोप चालक अमित आपटे यांनी या व्हिडिओ मधून केला आहे. तसेच घाटातून प्रवास करावा लागतो. घाट मार्गावरती ब्रेक न लागल्यास प्रवाशांच्या जीविताला धोका होऊ शकतो. ब्रेक डाऊन गाडी एसटी बस ३०० ते ४०० फूट दरीत कोसळल्यास प्रवाशांच्या जीवाला चालकासह धोका होऊ शकतो अशीही गंभीर बाब या चालकाने या व्हिडीओमध्ये कथन केली आहे. एसटी बसेसमध्ये बिघाड झाला आहे, या गाड्या या मार्गावरती पाठवू नका असं सांगितल्यावरती आगार व्यवस्थापक आमच्यावरतीच कारवाई करत आहेत, असा आरोपदेखील त्याने केला आहे. गाड्या दुरूस्तीबाबत तक्रार केली की, यांना ड्युटी लावू नका, यांना लोकलला पाठवा आणि पुणे व अर्नाळा आणि या मार्गावरती नवीन लोकांना ड्युटी लावण्याचे काम सुरू आहे. जेणेकरून नवीन लोक कोणतेही नवीन काम करणार नाहीत, असा आरोपदेखील चालक अमित आपटे यांनी या व्हिडीओमध्ये केला आहे.
प्रवाशांच्या जीवाशी खेळ – आपण गेली १४ वर्षे विनाअपघात सेवा देत आहोत. मात्र, आता आम्ही केवळ एसटी गाड्यांच्या नादुरुस्तीचे रिपोर्ट करत आहोत पण त्याकडे लक्ष दिले जात नाही, प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत असा गंभीर आरोप या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.
गंभीर दखल – या सगळ्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांच्याशी पत्रकारांनी अधिक माहिती मिळवण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी आपण या व्हिडीओची गांभिर्याने दखल घेतली असून तो व्हिडीओ विभाग नियंत्रक कार्यालयाकडून चौकशीसाठी पाठविण्यात येणार आहे. असे सांगितले. त्यासाठी विभाग नियंत्रक कार्यालयाकडून सुरक्षा सहाय्यक व तांत्रिक विभाग कर्मचारी अशा दोनजणांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
निलंबनाची कारवाई – हा व्हिडीओ व्हायरल करणारे देवरूख आगाराचे चालक अमित आपटे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल करून एस्. टी. महामंडळाची बदनामी केली तसेच प्रवाशांची दिशाभूल करून त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तक्रार करायची होती तर योग्य मार्गाने तक्रार करायला हवी होती. मात्र तसे न करता चुकीच्या मार्गाने व्हिडिओ व्हायरल केल्याने चालक अमित आपटे यांना एसटी सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती देखील विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी पत्रकारांना दिली.
२०१३ साली निलंबित – अधिक माहिती देताना विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हा चालक वादग्रस्त असून २०१३ साली त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती.