कोरोना काळानंतर, कोणतीही संसर्गजन्य साथ आली तरी सर्वांच्या काळजात धडकी भरत आहे. मुंबईत सध्या चिंतेचा विषय ठरत आहे ती, गोवरची साथ. गोवरची साथ मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात हाथ पाय पसरत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
गोवरमुळे दुसरा मृत्यू ओढवल्याची माहिती समोर आली आहे. गोवरमुळे एका वर्षाच्या मुलाने आपला जीव गमावला आहे. मुंबईतील पायधुनी नळबाजार येथील हा रहिवासी होता. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी या मुलाचा मृत्यू झाला असून, या मुलावर कस्तुरबा रुग्णालयामध्ये शुक्रवारपासून उपचार सुरू होते. या मुलाच्या मृत्यूचे कारण गोवर ब्रॉन्कोप्न्यूमोनियासह, मूत्रपिंड निकामी असे देण्यात आले आहे.
गोवर साथीने मुंबईतील हा दुसरा बळी गेला असून, या मुलाचे गोवर लसीकरणही करण्यात आले असल्याची माहिती मुलाच्या नातेवाईकांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा मुलगा गोवरमुळे व्हेंटिलेटर वर होता. दरम्यान,जानेवारीपासून ते आतापर्यंत १२४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या मृत मुलाचे नाव मोहम्मद हसन होते त्याला गंभीर फुप्फुसाचा संसर्ग झाला. त्यानंतर, त्याला श्वसनास अडचण निर्माण होत होती. शनिवारी दुपारपासून तो मुलगा व्हेंटिलेटर वर होता. पण, सोमवारी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
सध्या पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील वॉर्डस आणि आयसीयुमध्ये ताप व पुरळच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. ४ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर पर्यंत ६१ रुग्ण दाखल झाले आहेत. या एकूण ६१ रुग्णांपैकी ८ मुले ० ते ८ वयोगटातील आहेत. ९ ते ११ महिन्यातील ५, १ ते ४ वयोगटातील ३१, ५ ते ९ वयोगटातील १४, १० ते १४ वयोगटातील ०, आणि १५ वर्षांवरील एकूण ३ रुग्ण दाखल आहेत. तर, ६ मुलांवर ऑक्सिजन वर उपचार सुरू आहेत. त्यामुळे या गोवरच्या साथीमुळे परिस्थिती चिंताजनक बनत आहे.