मध्य प्रदेश सरकारने वैद्यकीय अभ्यासक्रम हिंदीतून उपलब्ध करून देण्याचा घेतलेला निर्णय ताजा असतानाच, आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची मोठी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजान यांनी दिली आहे.
एमबीबीएससह आयुर्वेद, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मराठीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. २०२३ च्या शैक्षणिक वर्षांपासून हे अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होतील. विशेष म्हणजे मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेणे बंधनकारक राहणार नाही, ते ऐच्छिक असेल.
मराठीतून वैद्यकीय अभ्यासक्रम बनविण्याची तयारी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू करण्यात आली. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील विविध तज्ज्ञांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे इंग्रजीतील पुस्तकांचे भाषांतर करताना कोणत्याही वैद्यकीय अभ्यासक्रमात फेरफार करण्यात येणार नाही. केवळ वैद्यकीय अभ्यासक्रमाची इंग्रजी पुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
यासाठी तीन स्तरावरील वैद्यकीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये समिती याची पाहणी आणि मांडणी करणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजी बाबतचा न्यूनगंड दूर करावा यासाठी हा निर्णय घेतला. याबाबत समित्या नेमल्या असून पुढील शैक्षणिक वर्षांपासून हा निर्णय लागू करण्याता आमचा प्रयत्न आहे या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, असंही महाजन म्हणाले आहेत.
राज्यात सध्याच्या घडीला एमबीबीएसचे शिक्षण देणारी ६२ महाविद्यालये आहेत. त्यात १०,०४५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये सरकार आणि महापालिकेची २७, खासगी २०, अभिमत विद्यापीठ १२ तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील तीन वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.