मुंबई-गोवा महामार्गाच्या सुरू असलेल्या कामांच्या पॅकेज संदर्भातील आरोली ते काटे व काटे ते खेड येथील रस्त्यांचे काम काही प्रमाणात संथगतीने सुरू आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. त्याबाबतची कारणे आज त्यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना विचारली. या कामांमध्ये तांत्रिक व आर्थिक निधीबाबतच्या ज्या अडचणी आहेत, त्या तातडीने दूर करून त्यावर कार्यवाही करण्यात येईल. परंतु, ३० जूनपर्यंत या मार्गाची किमान एक बाजू तरी सुरू करण्यात यावी, अशा सूचना मंत्री चव्हाण यांनी केल्या. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या प्रगती संदर्भात आज मंत्रालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. याप्रसंगी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून मुंबई-गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामाचा आढावा घेतला. अपूर्ण कामे जलद गतीने पूर्ण करून आमच्या कोकणवासीयांसाठी हा मार्ग लवकरात लवकर खुला कसा करता येईल यादृष्टीने तातडीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. उपाययोजना करण्याच्या सूचना मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याचे कामसुद्धा काही प्रमाणात झाले आहे. अपूर्ण कामे लवकर पूर्ण करून, कशेडी बोगद्यामधली किमान एक बाजू गणपतीपूर्वी वाहतुकीसाठी खुली करावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
मंत्री चव्हाण यांनी पनवेल ते इंदापूर टप्प्यातील अपूर्ण असलेल्या कामांबाबत ज्या काही तांत्रिक अडचणी व निधीची कमतरता आहे त्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून गणपतीपूर्वी या मार्गाची एकेरी वाहतूक सुरू करावी, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली. या सर्व मुद्द्यांवर आवश्यक उपाययोजना अंमलात आणून लवकरात लवकर मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल आणि कोकणवासीयांचा प्रवास सुखाचा होईल यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.