गेले आठवडाभर कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यामध्ये पूरजन्य स्थिती निर्माण झाली असून, समुद्राला आलेल्या उधाणामुळे किनाऱ्यालागतच्या अनेक गावांमध्ये, वाड्यामध्ये पाणी शिरले. रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्यागावामध्ये, प्रत्येक पावसाळ्यामध्ये हे काळजीचे करण असते. मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे समुद्राला भरती येऊन, पंधरामाड कांबळेवाडी समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याचे नुकसान झाले असून, किनाऱ्याची संपूर्ण वाताहत झाली आहे.
दिवसेंदिवस समुद्राचे पाणी वस्तीच्या दिशेने कूच करत आहे, अमावस्या-पौर्णिमा या दिवशी तर भरतीच्या वेळी किनाऱ्यालगत राहणारे नागरिक जीव मुठीत घेऊन राहतात आणि ही परिस्थिती अनेक वर्षे तशीच आहे. समुद्राला आलेल्या उधाणाने मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर वारंवार होणाऱ्या समुद्राच्या लाटेच्या माऱ्यांमुळे मोठे भगदाड पडले असून, लोकांच्या घरामध्ये पाणी शिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिऱ्या पंधरा माड परिसरातील जवळपास पंधरा फुटापेक्षा जास्त किनारा समुद्राने गिळंकृत केला आहे. यामुळे प्रत्येक पावसाळ्यामध्ये मिऱ्यावासीयांची भीती कायम आहे. पाण्याचा जोर एवढ्या जास्त प्रमाणात असल्या कारणाने, किनाऱ्यालगतचा रस्ता देखील वाहून जाण्याची शक्यता, स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यावर तात्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून साडेतीन किलोमीटरचा, कोट्यवधी रुपयांचा बंधारा मंजूर केला असून, त्याची निर्मिती पूर्ण होण्यासाठी अजून काही कालावधी जाणे अपेक्षित आहे. पण तोपर्यंत जर समुद्राच्या लाटांचा मारा असाच सुरु राहिला तर, हळू हळू सर्व गाव गिळंकृत होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शासनाने त्वरित काहीतरी उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.