संगमेश्वर येथील बेपत्ता महिलेची चप्पल, पर्स चिपळूणमधील गांधारेश्वर पुलावर आढळून आल्याने तर्क कुतर्क लढविण्यात येत आहेत. या महिलेचा अजूनही थांगपत्ता लागत नसल्याने या महिलेने नदीपात्रात उडी घेऊन आपल्या जीवाचे काही बरे-वाईट तर केले नाही ना, अशी शंका उत्पन्न होत आहे. त्याचबरोबर कुटुंबासह पोलीसांनाही चकवा देत पर्स आणि चप्पल जाणूनबु जून पुलाजवळ टाकून ही महिला पसार तर झालेली नाही ना, अशा अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान पोलीसांनी बोटीच्या माध्यमातून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती सापडली नाही. या घटनेने चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात खळबळ उडाली आहे. सौ. अपेक्षा अमोल चव्हाण असे बेपत्ता महिलेचे नाव असल्याची माहिती संगमेश्वर पोलीसांकडून पत्रकारांना देण्यात आली. अपेक्षा घरात कोणालाही काही न सांगता निघून गेली होती. त्यामुळे तिच्या पतीने ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
घरातून न सांगता निघून गेली – मिळालेल्या माहितीनुसार, संगमेश्वर येथील रहिवासी असलेली अपेक्षा अमोल चव्हाण (वय सुमारे ४०) ही मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेली. तिचे पती अमोल चव्हाण यांनी तात्काळ शोध घेतला. मात्र ती न सापडल्याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या मोबाईल लोकेशनची तपासणी केली असता, तिचे शेवटचे लोकेशन चिपळूण येथील गांधरेश्वर पुलावर दिसून आले.
चप्पल, पर्स सापडली – या माहितीनंतर, अपेक्षाचे कुटुंब आणि पोलीस तातडीने गांधारेश्वर पुलावर पोहोचले. तिथे त्यांना पुलावर अपेक्षाची चप्पल आणि पर्स सापडली. मात्र तिचा पत्ता लागला नाही. पोलीसांनी बोटीच्या साहाय्याने देखील ‘शोध घेतला, मात्र हाती काही लागले नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या महिलेने खरोखरच पुलावरून उडी मारून आपल्या जीवाचे काही बरे वाईट तर केले नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे. त्याचबरोबर चप्पल आणि पर्स येथे टाकून ती रेल्वेने दुसऱ्या गावी निघूनही गेली असेल आणि दिशाभूल करण्यासाठी गांधारेश्वर पुलाजवळ आपली पर्स आणि चप्पल टाकली असावी, अशीही चर्चा सुरू आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
पुन्हा गांधारेश्वर पूल – यानिमित्ताने चिपळूण शहरातील गांधारेश्वर पूल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी एका विवाहितेने पतीसह आपल्या आयुष्याची अखेर याच पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी मारून केली होती. या पार्श्वभूमीवर चर्चाना पेव फुटले आहे.
कसून शोध सुरू – चिपळूणचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नदीपत्रात बोटिंद्वारे या महिलेचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्याचे काम पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे. यामुळे आणखी काही माहिती हाती लागते का, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ही महिला घरातील काही वादामुळे अनेक दिवस टेन्शनमध्ये होती, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आल्याची माहिती, चिपळूण पोलीस सूत्रांनी दिली आहे.