विनाकारण त्रास द्याल, खोटे गुन्हे दाखल कराल तर आम्हीही गप्प बसणार नाही’ असा रोखठोक इशारा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आ. अॅड. अनिल परब यांनी येथे दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आ. अनिल परब यांनी गुरुवारी २३ मे रोजी खेड पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली, त्यांचे मित्र तसेच उद्योजकं सदानंद कदम यांच्यावर काही राजकीय नेते आकसापोटी खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा त्यांचा आरोप असून, गृह आणि महसूल खातं तो पुढारी चालवतो काय? असा प्रश्न अॅड. अनिल परब यांनी उपस्थित केला आहे.
तसेच सत्ता येते, जाते. आज त्यांचे दिवस आहेत… उद्या आमचे येतील. त्यावेळेला आम्ही देखील या सगळ्या गोष्टींची व्याजासकट परतफेड करू, असे आ. अॅड. अनिल परब यांनी खेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या भेटीप्रसंगी सांगितले. उद्योजक सदानंद कदम यांचे मूळ गाव असलेल्या जामगे या ठिकाणी झालेल्या किरकोळ बाचाबाची प्रकरणामुळे बड्या राजकीय नेत्यांनी एका व्यक्तीला पुढे करत खोटा गुन्हा खेड पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी दाखल केला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. उद्योजक, सदानंद कदम त्या गावचे रहिवासी असून त्या ठिकाणी असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी काही जणांची सुरू असलेली भांडणे मिटवण्याचा प्रयत्न केला.
मात्र एका बड्या राजकीय नेत्याला हे पहावत नसल्यामुळे आपल्या राजकीय वर्चस्वाचा फायदा घेत पोलीस ठाण्यात सदानंद कदम यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले, असा आरोप परब यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर अॅड. अनिल परब गुरुवारी अचानक खेड पोलीस स्थानकात दाखल झाले. खेड पोलीस ठाण्यात खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांची त्यांनी भेट घेतली. पोलिसांनी कोणत्याही नेत्याचे ऐकू नये, कोणत्याही राजकीय नेत्याच्या दबावाखाली बळी पडून पोलिसांनी चुकीचं काम करू नये, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील, सत्ता येते आणि जाते. आज त्यांचे दिवस आहेत उद्या आमचेदेखील येतील. विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून शारीरिक, मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला.. तर आम्ही गप्प बसणार नाही, असाही इशारा आ. अनिल परब यांनी दिला आहे.