एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले आम. उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात मंगळवारी अचानक हल्ला करण्यात आला असून, त्यामध्ये गाडीची काच फोडण्यात आली आहे. कात्रज परिसरात ही हल्ल्याची घटना घडली. काही शिवसैनिकांनी गद्दार गद्दार म्हणत शिंदे गटातल्या उदय सामंत यांच्यावर हल्ला केला. सामंत यांनी ट्विट करुन या हल्लाबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “गद्दार म्हणता तरी शांत आहे…शिव्या घालता तरी शांत आहे..आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे.. लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल??.. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही..काळ ह्याला उत्तर आहे..अंत पाहू नका.. जय महाराष्ट्र”
पुण्यात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे दोघेही दौऱ्यावर होते. कात्रज पुणे येथे आयोजित शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरेनी शिवसैनिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात सध्या फक्त घाणेरडे राजकारण आणि खोटे बोलण्याचे काम सुरू आहे. राजकारणात चांगली लोकं टिकतात हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. म्हणून तुम्ही मला साथ द्या,’’ अशी भावनिक हाक युवासेना प्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिली. त्यावेळी प्रचंड समुदायाने घोषणा देऊन ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.
उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या हल्ला प्रकरणावरून आता मुख्यमंत्री शिंदेंनी देखील विरोधकांना सुनावलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “उदय सामंत यांच्यावर भ्याड हल्ला झाला आहे. ही मर्दुमकी नाही. कोणी कायदा, सुव्यवस्था हातात घेऊन ते बिघडवण्याचं काम करत असेल, तर पोलीस योग्य ती कारवाई करत आहेत. गुन्हा झाल्यावर पोलिसांना सांगावं लागत नाही की गुन्हा दाखल करा. जे कोणी चिथावणी खोर भाषण करत असेल, तर पोलीस कारवाई करतील. कायदा सुव्यवस्था पोलीस पाहतील. मला राज्यात शांतता हवी आहे”. या हल्ला प्रकरणी शिवसेनाप्रमुख संजय मोरेंसह चारजणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.