शंभर-दोनशे रुपये नुकसानभरपाई आम्हाला नको… आमची वर्षभराची मेहनत वाया गेली प्रचंड नुकसान झाले आहे… नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी ५० हजार रुपये पाहिजेत… तसे झाले तर ठीक नाही तर शे-दोनशे रुपये आणि कुजलेला भाताचा पेंढा तहसीलदार कार्यालयात जमा करू… असा इशारा मनसेने दिला असून त्यासंदर्भात मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी सोमवारी तहसिलदाराना तसे निवेदन दिले आहे. तयार झालेली भातशेती वाया गेली धो-धो कोसळणाऱ्या पावसाने आहे. कापणी सुरू असतानाच कोसळणाऱ्या पावसाने शेतकऱ्याना अक्षरशः अश्रू ढाळायला लावले आहेत. नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत, मात्र नुकसानभरपाई किती मिळेल? याची खात्री नाही, म्हणूनच मनसेच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून ५० हजार सरसकट नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे.
चेष्टा खपवून घेतली जाणार नाही काही वर्षांपूर्वी अशीच अवस्था कोकणात झाली होती. कोकणातील शेतकरी किती नुकसान झाले तरी रडणारा नाहीं, आत्महत्या करणारा नाही की शासनाचे कर्ज डुबवणार नाही. स्वाभिमानी शेतकरी असून गत वेळेला अशीच शंभर-दोनशेची नुकसानभरपाई देऊन चेष्टा करण्यात आली होती. मात्र यावेळी असे घडले तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा राजू खेतले यांनी दिला.
शेतकरी हतबल – वर्षभर मोठ्या कष्टाने पिकवलेली भातशेती पावसाने उद्ध्वस्त झाल्याचे बघून शेतकरीवर्ग हतबल होऊन गेला आहे. काही भागात भातशेतीनंतर अन्य पिके घेतली जातात. मात्र तीही पिके धोक्यात आली आहेत. आंबा-काजू पिकांना ही धोका निर्माण झाला आहे. कोकणातील शेतकऱ्यांवर हे नैसर्गिक मोठे संकट आले आहे. अनेक संकटांचा सामना करणारी आम्ही लोक आहोत. पण शासनाने भरघोस मदत कधी केली नाही. यावेळी करावी ही आमची माफक अपेक्षा आहे आणि ती आपल्या माध्यमातून शासनापर्यंत पोहचवावी, अशी विनंतीही राजू खेतले यांनी तहसीलदारंना केली.
चाऱ्याचा प्रश्न गंभीर – कोकणात भातशेतीचा पेंढा चारा म्हणून जनावरांना वापरला जातो. खास करून पावसल्यासाठी याचा साठा करून ठेवला जातो. मात्र ना गवत राहिले ना भात पेंढा राहिला आहे; त्यामुळे जनावरांना आता खायला काय घालायचे? हा प्रश्न ही निर्माण झाला आहे. कधी नव्हे तो शेतकरी संकटात आला असल्याचे राजू खेतले यांनी सांगितले.
किमान ५० हजार मिळावेत – शेतीचा विमा असो अथवा नसो हेक्टरी किमान ५० हजार रुपये नुकसानभरपाई शासनाकडून मिळाली पाहिजे, तरच शेतकरी कुठे उभा राहील, अन्यथा कोकणातील शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल होईल, याचा गांभीर्याने विचार करावा, असे राजू खेतले यांनी स्पष्ट केले.
..तर कार्यालयात आणून टाकू – आम्ही कोकणी शेतकरी शांत आहोत. आमचे नुकसान झाले तरी आम चा पीक रस्त्यावर आणून टाकणार नाही. मात्र शासनाने जर नुकसानभरपाईची चेष्टा केली तर मग मनसे गप्प बसणार नाही. कुजलेला पेंढा आणि शे-दोनशेची नुकसानभरपाई तहसिलदार कार्यालयात आणून टाकेन, असा इशारा राजू खेतले यांनी दिला आहे.
मनसैनिक उपस्थित – यावेळी मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांच्यासह म नसे शेतकरी संघटना सागर चिले, संतोष हतीसकर, शहराध्यक्ष राजेंद्र गोंजारी, विनोद चिपळूणकर, भाई सुर्वे, संजय वाजे, संजय मठपती, अमित राऊत, विवेक मोहिते, महेंद्र कदम, उमेश पवार, दीपक खेडेकर आदींसह मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.

