रानागिरी शहरातील दुरवस्था झालेल्या अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती तत्काळ करा, प्रलंचित घनकचरा आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसडीपी) कार्यन्वित करा, अनधिकृत परप्रांतीय फेरीवाल्यांच्या टपऱ्या व अतिक्रमणे काढा अशा समस्यांवर प्रशासनाने तत्परतेने कारवाई करावी, अशी मागणी करत मनसे पदाधिकारी रत्नागिरी नगरपालिकेवर धडकले. याबाबत मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेऊन हे प्रश्न त्यांच्यापुढे मांडले. मनसे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्याचा मनस्ताप रत्नागिरीतील नागरिकांना होत आहे. रोजच्या त्रासामुळे नागरिक असहाय्य झालेले आहेत. याची जाणीव रत्नागिरी पालिकेच्या ढिम्म प्रशासनाला होत नाही. त्यामुळे अनेक वाहनाचे अपघात होत आहेत. वाहनांच्या देखभालीचा खर्च नागरिकांना होत आहे.
पालिकेला कर भरणा करूनही हा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने शहरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला घनकचरा प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे. त्याबाबतची सत्य परिस्थिती अवगत करावी यासाठी पालिका प्रशासनाने श्वेतपत्रिका काढावी अशा मागण्या मनसे पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. याप्रसंगी मुख्याधिकारी वैभव गारवे यांना निवेदन देताना मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष रूपेश जाधव, शहर संघटक अमोल श्रीनाथ, तालुका सचिव अभिलाष पिलणकर, शहर उपाध्यक्ष राजेश नंदाने, राहूल खेडेकर, विभाग अध्यक्ष सोम पिलणकर, आदित्य चव्हाण, अक्षय सुतार, सर्वेश जाधव, सागर मयेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.