प्रत्येकाच्या प्रेरणास्थानी एखादी व्यक्ती, देव, किंवा एखादे ऐतिहासिक व्यक्तिमत्व असते. एखाद्याकडे बघून आपल्याला वाटते कि, यांच्यासारखे आपण आयुष्यात वागले पाहिजे. म्हणजेच आपण त्या व्यक्तीची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवूनच त्याप्रमाणे आचरण करण्याचे निश्चित करतो. एखादा चाहता आपल्या प्रेरणास्थानासाठी कोणत्याही हद्दीपर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी कोणत्याही अडचणीचा सामना तयार करण्याची तयारी असते. असेच काहीसे उदाहरण आपण आज पुण्यातील एका पंतप्रधान मोदींच्या चाहत्याचे बघणार आहोत.
पुणे औंध येथील रहिवासी असलेले मयुर मुंडे या भाजप कार्यकर्त्याने स्वतःची मालकीच्या जागेमध्ये चक्क आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर उभारले आहे. पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवांषु तिवारी यांनी खास जयपूरमधून मोदींचा पुतळा तयार करुन घेतला आहे. याकरिता साधारण १ लाख ६० हजार रुपये इतका खर्च आला आहे. या मंदिराच्या उभारणीनंतर मात्र सर्वत्र चर्चेला एकच विषय मिळाला आहे.
मोदींच्या या चाहत्याने मोदींचे मंदीर बांधून त्यांना एक प्रकारे दैवत्व बहाल केले आहे. परंतु, अशा प्रकारे पंतप्रधान मोदींचे मंदिर उभारण्यात आल्याने चहुबाजूंनी सडकून टीका होऊ लागल्याने हे मंदिर एका रात्रीत हटवण्यात आले आहे. सर्वत्र टीका होऊ लागल्याने थेट पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेतली आहे. आणि मग पंतप्रधान कार्यालयातून फोन आल्यानंतर हे मंदिर झाकण्यात आले असून, त्यातील मोदींची मूर्ती एका रात्रीत बाजूच्याच नगरसेवकांच्या कार्यालयात बसवण्यात आली आहे.
आज या पुतळयाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून नैवेद्य दाखवायचा इशारा देण्यात आला होता, मात्र त्याआधीच हा पुतळा तिथून हलवण्यात आला आहे. रातोरात हा पुतळा हटवण्यात आल्याने राजकीय खळबळ माजली आहे. या मंदिरा विरोधात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन केले होते.