जिल्ह्यात अमली पदार्थांची तस्करी व विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी हाती घेतलेल्या मोहिमेंतर्गत गांजा वा तत्सम प्रकरणात सामील असलेल्या २५ जणांविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत. तडीपारीची ही कारवाई झाल्यानंतर जिल्ह्यातील अमली पदार्थ विक्रीला प्रतिबंध बसेल, असा विश्वास जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केला. आसाम, सातारा, पंढरपूर या भागात गांजा कनेक्शन असल्याचे पोलिस तपासात पुढे आले असून, त्यादृष्टीने तपासाला दिशा दिल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी चिपळूण तालुक्यात गांजा विक्रीप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी आठ जणांवर कारवाई केली.
या कारवाईनंतर गुहागरात १ किलो ३९० ग्रॅमचा गांजा जप्त केला होता, तर रत्नागिरी शहरातील कर्ला परिसरात ४२ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन जप्त केले होते. शहर परिसरात अन्य चार कारवाई केल्या होत्या. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात छोट्या-छोट्या पुड्या जप्त करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आसाम, सातारा, पंढरपूर या भागांतून गांजा हा अमली पदार्थ आणला जात आहे तर, मुंबईसारख्या भागातून ब्राऊन हेरॉईन हा अमली पदार्थ आणून त्याची विक्री केली जात असल्याचे तपासात पुढे आले आहे.
हे अमली पदार्थ कोणत्या मागनि जिल्ह्यात येत आहे याचा शोध घेतला जात आहे. जिल्ह्यात आसाम भागातून मोठ्या प्रमाणात गांजा आणला जात असल्याचे तपासात पुढे आले आहे. तेथील काही धागेदोरेही हाती लागले आहेत. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच गांजाविक्रीच्या मुळापर्यंत पोहोचून जिल्ह्यातून अमली पदार्थ हद्दपार करणार आहे. आसपासच्या काही जिल्ह्यांतूनही रत्नागिरीत गांजा येतो. त्याचीही बारकाईने माहिती घेतली जात आहे.