अनेक महिन्यापासून दुर्लक्षित झालेल्या मोकाट जनावरांच्या प्रश्नाने ऐन गणेशोत्सवात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर तळ ठोकून बसणाऱ्या मोकाट जनावरांसह गाढवे, कुत्री यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. परंतु पालिकेकडे कोंडवाड्याची ठोस व्यवस्था नसल्याने कारवाई होत नाही. परिणामी अपघात घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न चिपळूणकरांपुढे कायम आहे. सध्या बाजारपेठ परिसरात मोकाट जनावरांचे प्रमाण वाढले आहे. मुख्य रस्त्यावर मोकाटपणे जनावरे फिरत असल्याने त्यातून अपघाताचे प्रकारही वाढले आहेत.
पालिकेकडे कोंडवडा उपलब्ध नसल्याने पकडलेल्या जनावरांची व्यवस्था कुठे करावी, असा प्रश्न पालिकेसमोर आहे. याआधी तात्पुरती खेडेकर क्रीडा संकुलाच्या पार्किंग जागेत काही जनावरांची व्यवस्था केली जात होती. परंतु तेही सोयीचे नसल्याने पालिकेने कारवाई करणेच सोडून दिले आहे. भाजी मंडई परीसरात नेहमीच मोकाट जनावरांची गर्दी होत असते. याठिकाणी टाकाऊ भाजीपाला नेहमी चारण्यास मिळत असल्याने या भागात मोकाट जनावरे दिसतात. बाजारपेठ व भाजी मंडई मागील रंगोबा साबळे मार्गावरही मोकाट जनावरे नेहमी दिसून येतात.
बाजारपेठेतील चिंचनाका ते पॉवर हाऊस दरम्यानच्या रस्त्यावरही मोकाट जनावरे व गाढवांची संख्या वाढली आहे. भोगाळे येथे रस्त्याच्या मधोमध ती नेहमी उभे राहत असल्याने अनेकदा किरकोळ अपघात घडले आहेत. चिपळूण शहरातील बहाद्दूरशेख नाका परिसरातील गांधी नगर येथे जांभा, वाळू वाहतुकीच्या व्यवसायानिमित्त गाढवांचे पालन केले जाते. मात्र, काहीजण काम होताच गाढव शहरात मोकाट सोडून देतात. त्यामुळे चिंचनाका ते बहादूरशेख नाका दरम्यानच्या रस्त्यावर गाढवांची संख्या अधिक असते.