अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. निधनाच्या तिसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या निधनाला ७२ तासही उलटत नाहीत, तोपर्यंत सुनेत्रा पवारांनी अशाप्रकारे शपथ घेतल्याने यावर विरोधकांकडून टीका होत आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांना शह देण्यासाठी हा शपथविधी घडवून आणला; असा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.
खा. सुनिल तटकरे यांनी अत्यंतः गलिच्छ राजकारण केल्याचा उघड आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. राजकारणात जो माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करू शकतो, तो काहीही करू शकतो, अशा आशयाचं वक्तव्य कदम यांनी केलं आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष महायुतीचा भाग आहेत. तरीही कदम यांनी अशाप्रकारे तटकरे यांच्यावर टीका केल्याने महायुतीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
गलिच्छ राजकारण – रामदास कदम यांनी अजितदादा पवारांच्या निधनानंतर घडलेल्या घडामोडींवर पत्रकारांशी भाष्य करताना तटकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, अजितदादांच्या जाण्यानंतर शरद पवारांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी अत्यंत गलिच्छ राजकारण केलं. दादांच्या चितेची राख देखील शांत झाली नव्हती, तोच तटकरेंनी वहिनींना (सुनेत्रा पवार) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. हिंदू संस्कृतीनुसार किमान दहा दिवस दुः खाचे पाळावे लागतात, त्यानंतर शपथविधी झाला असता तर काय बिघडलं असते? शरद पवार पक्षाचा ताबा घेतील, या भीतीने तटकरेंनी ही ‘चालाख खेळी’ केल्याचा आरोप कदमांनी केला. ज्या माउलीचे कुंकू आणि मंगळसूत्र गेले, त्यांना सुतकही’ पाळू न देता मुंबईला आणून शपथविधी करायला लावणाऱ्यांना महाराष्ट्र कधीही साफ करणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

