रत्नागिरी पालिकेचा घनकचरा प्रकल्पाला अजून जागा आणि मुहूर्त मिळत नाही आहे. अनेक कारणांनी तो अजून बारगळलेलाच आहे. त्यामुळे सध्या सर्व कचरा साळवी स्टॉप येथे डम्प केला जातो. अशातच शहरातील शेकडो टन कचर्यामुळे साळवी स्टॉप परिसरामध्ये दूर दूरवर दुर्गंधी पसरली आहे. तसेच त्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावताना आग आणि घुराचे लोट हवेत उंचच्या उंच पसरत असल्याने, त्याचा परिणाम म्हणून हवा प्रदूषित होतेच, सोबत वाहतुकीला सुद्धा त्रास होतो. रत्नागिरी पालिकेला वारंवार नोटीस बजावूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
त्यामुळे आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने रत्नागिरी नगरपालिकेवर ठोस कडक कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून कचरा डेपोची पुन्हा एकदा पाहणी करून कारवाईबाबत अंतिम प्रस्ताव प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यात पालिकेवर कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील बऱ्याच वर्षापासून रत्नागिरी पालिका घनकचरा प्रकल्प खितपत पडला आहे. परंतु अद्याप रत्नागिरी नगर पालिकेला काही मुहूर्त सापडलेला नाही. माजी नगराध्यक्ष कै. उमेश शेट्ये यांनी दांडेआडोम येथे घनकचरा प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, स्थानिकांनी त्याला विरोध करून न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाचे कामकाज तब्बल दहा ते पंधरा वर्षे सुरु असून, न्यायालयीन लढा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना पालिकेला घनकचरा प्रकल्प उभारायला विरोध केला नव्हता. त्यामुळे पालिकेने पुन्हा एकदा तेथे प्रकल्प उभारण्याची तयारी केली होती. परंतु स्थानिकांच्या विरोधामुळे पालिकेने हा आपला निर्णय रद्द केला. आता सध्या तरी घन कचरा प्रकल्प जागेचा प्रश्न अनुत्तरीतच आहे.