कोल्हापूर मुंबई विमानसेवा कोरोना काळापासून बंद करण्यात आली होती. कोल्हापूर मुंबई विमानसेवेला पर्यटक विद्यार्थी आणि भविकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. पण कोरोना काळात कंपनीने अचानक ही सेवा बंद केली होती. त्यानंतर सेवा सुरू व्हावी अशी प्रवाशाकडून वारंवार मागणी करण्यात येत होती.
बहुप्रतिक्षित असणारा कोल्हापूर-मुंबई विमानसेवेची सुरवात आजपासून होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थितीत राहणार आहेत. त्याचबरोबर ही सेवा संजय घोडावत यांच्या ‘स्टार एअरवेज’ कंपनीकडून सुरू करण्यात येत आहे. मुंबई-कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ही आठवड्यातून तीन दिवस असणार आहे. आठवड्यातील मंगळवार, गुरुवारी आणि शनिवारी ही विमानसेवा असणार आहे. या सेवेमुळे प्रवाशांचा खूप वेळ वाचणार आहे.
कोल्हापूर ते मुंबईसाठी २ हजार ५७३ रुपये इतका तिकीट दर असणार आहे. या विमानसेवेमुळे कोल्हापूर- मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. मुंबई विमानतळावरून हे विमान १०.३० वाजता उड्डाण करणार असून आणि कोल्हापुरात ११.२० मिनिटांनी पोहोचणार आहे. हा प्रवास अवघ्या ४० मिनिटाचा असणार आहे. तर कोल्हापुरातून सकाळी ११.५० वाजता उड्डाण करून हे विमान मुंबईत १२.४५ वाजता पोहचेल. कोल्हापूर – मुंबई अशी विमानसेवा सुरु व्हावी, अशी अनेक दिवसांपासून प्रवाशांची मागणी होती ती आज अखेर पूर्ण होत आहे.
महामार्गांची दुरावस्था बघून नक्की कोणत्या मार्गे प्रवास करावा, अशी अनेकांची द्विधा मनस्थिती असायची. बऱ्याच कालावधीनंतर विमानसेवा सुरु झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.