सिंधुदूर्गमधील चिपी विमानतळाचा ९ ऑक्टोबर रोजी उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. केंद्रीयमंत्री आणि चिपी विमानतळाचे शिल्पकार नारायण राणे यांच्या उपस्थितीत केंद्रातील अनेक मंत्री यावेळी उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. अलायन्स एअरची विमानसेवा आता सुरू होत असल्याने सिंधुदूर्गवासियांनी आनंद व्यक्त केला आहे. मुंबई ते सिंधूदुर्ग अंतर आत्ता केवळ तासांचेच झाले आहे.
या विमानाची वेळ सकाळी ११.३५ वा. मुंबईहून निघेल व १ वाजता सिंधुदुर्ग एअरपोर्टवर पोहोचेल. सिंधुदुर्गावरुन १.२५ वा. निघेल व मुंबई येथे २.३० वा. पोहोचेल. मुंबई ते सिंधुदुर्ग तिकीट दर २,५२० रुपये तर सिंधुदुर्ग ते मुंबई तिकीट दर २,६२१ रुपये असा आहे. २० ऑक्टोबर पर्यंतची सर्व तिकिटे फुल झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
एअर इंडियाची अलायन्स एअर ही प्रादेशिक उड्डाण उप कंपनी आहे. एअर इंडिया लवकरच एका खासगी कंपनीच्या ताब्यामध्ये जाणार आहे. अलायन्स एअरने सांगितले की, ९ ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग दररोज विमान उड्डाणे सुरू करणार आहे. त्याच्या येण्या जाण्याच्या तिकीट दरावरून मोठी चर्चा रंगली असून, अनेक जण गझाली करत आहेत कि, येऊक जाऊक अंतर सारखाच, मगे तिकीटावांगडा १०१ रुपेचे फरक कसो!
चिपी विमानतळाचे उद्घाटन विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते ९ ऑक्टोबर रोजी होणार असून या दिवसापासून सिंधुदुर्ग ते मुंबई दरम्यान थेट विमानसेवा सुरू होणार आहे. देशातील हवाई वाहतुकीला प्रोत्साहन मिळावे यासाठी, त्याचप्रमाणे देशांतर्गत हवाई प्रवास देखील सहज होण्यासाठी केंद्र सरकारने प्रादेशिक जोडणी योजना सुरू केली असून, त्याअंतर्गत देशाच्या छोट्या विमानतळांवरून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याकडे भर दिला गेला आहे.