कोरोनाच्या काळात बहुतांशी लहान मोठे व्यवसाय बंद झाल्यामुळे नागरिक आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशामध्ये काही शाळा आणि महाविद्यालयांकडून फी वसूली करण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्यक्ष शाळा सुरु नसल्या तरी, ऑनलाईन शाळा आणि महाविद्यालय सुरु करण्यात आली आहेत. अनेक इंग्रजी मिडीयमच्या शाळांची फी अवास्तव आकारल्या जात असल्याने, आणि फी साठी काही शाळांनी तगादा लावल्याने, विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत.
जमापुंजीचा सद्य स्थितीमध्ये वापर केला जात असून, सध्या नोकरदार वर्ग सुद्धा काही प्रमाणात बेरोजगार झाल्याने, तसेच इतर काहीच उत्पन्नाचे साधनच नसल्याने, मुलांच्या भरमसाठ फी भरायच्या तरी कशा! असा प्रश्न बऱ्याच पालकांसमोर आ वासून उभा ठाकला आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांकडून सतत शाळा आणि महाविद्यालयांच्या फीमध्ये सवलत मिळावी अशी मागणी करण्यात येत होती. आता मुंबई विद्यापीठा कडून सर्व महाविद्यालयांना फी माफीचे आदेश पाठवण्यात आले आहेत.
कोरोनाच्या काळात अनुभवत असलेल्या आर्थिक अडचणीमुळे, विद्यार्थ्यांना ३० टक्के माफी तर ज्या विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांना १०० टक्के फी माफी करण्यात यावी, असे निर्देश सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. याबाबत मुंबई विद्यापीठाकडून सर्व महाविद्यालयांना नोटीसा देखील पाठवण्यात आल्या असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील फी सूचित निर्देशानुसार माफ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे काही अंशी विद्यार्थी आणि पालकवर्गाला दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या काळामध्ये शैक्षणिक विवंचनेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हि नक्कीच आनंदाची बातमी ठरेल.