सरकारच्या राज्य रस्ते महाविकास महामंडळाने आज कोकणच्या या हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्गाची रुपरेषा जाहीर केली.
कोकणात तिसरा महामार्ग – या रुपरेषेनुसार या महामार्गाची लांबी ३७६ कि.मी. असून त्याचा अंदाजित खर्च तब्बल ६८७२० कोटी इतका असेल. हा महामार्ग ६ पदरी असून त्याच्या दोन्ही बाजूला २ सव्र्व्हस रोड असतील. या महामार्गावर एकूण ४१ बोगदे, ५१ मोठे ब्रीज आणि ६८ ओव्हरपास असतील असे सांगण्यात येते.
१५० ची स्पीड ! – मुंबई – गोवा महामार्ग, सागरी महामार्ग व हा तिसरा हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्ग असे तीनही महामार्ग एकमेकाला जोडले जाणार आहेत. हा महामार्ग ‘एक्स्प्रेस हायवे’ असेल. या महामार्गावरुन वाहने ताशी १५० च्या स्पीडने धावतील आणि मुंबई ते गोवा अंतर फक्त ६ तासात पार करता येईल.
६ पदरी महामार्ग – रेल्वेप्रमाणे हा हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्ग अधिक प्रमाणात सरळसोट असेल. अटल सेतूवरुन अलिबाग तालुक्यातील शहाबाद पर्यंत पहिला टप्पा असेल. तेथून पुढे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे तसेच गोव्यापर्यंत हा मार्ग जाईल. महामार्ग ६ पदरी असून तब्बल १०० मीटर रुंदीचा असेल. कोकणातील बहुतांशी तालुक्यातून या महामार्गाचा प्रवास होईल.
मधून जाणारा महामार्ग – मुंबई – गोवा महामार्ग व सागरी महामार्ग या दोन महामार्गांच्या मधून जाणारा असा हा तिसरा महामार्ग राहील. महामार्गावरील ‘इंटरचेंज’ असेल तेथे वाहने महामार्गावर प्रवेश करु शकतील तसेच बाहेर पडू शकतील. या महामार्गासाठी सुमारे ३७९२ हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. त्यातील सुमारे १४६ हेक्टर वन जमीन असेल.
महामार्गाची आखणी – हा हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्ग अटल सेतूवरुन मुंबईतून अलिबाग तालुक्यातील शहाबाद येथे येईल. तेथून पुढे रोहा तालुक्यातील घोसाळे येथे, पुढे माणगाव तालुक्यातील मडेगाव आणि मंडणगड तालुक्यातील केळवट पर्यंत येईल. पुढे हा ग्रीनफिल्ड महामार्ग दापोली तालुक्यातील वाकवली, गुहागर शहर मार्गे गणपतीपुळे, रत्नागिरी पर्यंत येईल.
असा असेल महामार्ग – हा ग्रीनफिल्ड महामार्ग रत्नागिरीनंतर राजापूर तालुक्यातील भालवली मार्गे देवगड शहरापर्यंत जाईल. तेथून पुढे तो मालवण शहरापर्यंत जाईल. नंतर कुडाळ तालुक्यातील चिपी विमानतळा जवळून वेंगुर्ले मार्गे सावंतवाडी – शहरातून पुढे जाईल. नंतर, हा महामार्ग बांदा येथून गोव्याला मार्गस्थ होईल.
३ वर्षात पूर्ण करणार! – या ग्रीनफिल्ड महामार्गाचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. पर्यावरण विभागाच्या सुचना लक्षात घेऊन आरेखनात काही बदल देखील करण्यात आले आहेत. हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी ३ वर्षांचा अवधी देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निवडणूकीसाठी गाजर ? – मात्र या सर्व बाबी ‘जर तर’च्या असून निवडणूकीसाठी कोकण वासियांना दाखवण्यात आलेले हे एक ‘गाजर’ होय असेच मत याबाबत अनेक कोकणवासियांनी सडेतोडपणे व्यक्त केले. कोकणातील सागरी म हामार्ग सुमारे ३० वर्षांपासून अद्यापही रखडलेला आहे. तर मुंबई – गोवा महामार्ग मागील ११ ते १२ वर्षे रखडला आहे.
कोकण ‘भकास’ झाला! – मुंबई – गोवा महामार्गठिकठिकाणी खणून ठेवण्यात आला, उखडून ठेवण्यात आला त्यामुळे कोकणची अर्थव्यवस्था धुळीस मिळाल्यासारखी झाली. महामार्गाच्या अत्यंत खराब परिस्थितीमुळे कोकणातील पर्यटन व्यवसाय जवळपास लयास गेला आणि कोकणातील उद्योग व्यवसायांची अतिशय दयनीय परिस्थिती झाली. याला महामार्गाची ‘पनवती’ जबाबदार असल्याची भावना कोकणातील जनतेत खुलेआम व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत हे तिसऱ्या महामार्गाचे ‘गाजर’ काय म्हणून दाखवता? असा सवाल देखील जनतेत ठिकठिकाणी विचारला जाऊ लागला आहे.