पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईचं सामर्थ्य वाढवण्यासाठी आपलं सरकार मोठे प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील लोकलचे पारंपारिक रूप पालटून त्याला अत्याधुनिक आणि नवीन रुप देणार असल्याची घोषणा केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं लोकार्पण करण्यात आले. यावेळी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कार्यक्रमस्थळी येण्यासाठी मुंबई लोकलने प्रवास केला
या नव्या मार्गिकामुळे मुंबईच्या लाईफलाईनला अधिक गती प्राप्त होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पुढे ते म्हणाले की, “या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे चार प्रमुख फायदे होणार आहेत. ते म्हणजे लोकल आणि एक्प्रेससाठी वेगवेगळ्या लाईन उपलब्ध होतील, इतर राज्यांतून येणाऱ्या गाड्यांना त्यामुळे साईड देण्यासाठी तासंतास थांबावं लागणार नाही. कल्याण ते कुर्ला दरम्यान वाहतूक सुविधा वाढतील आणि मेगा ब्लॉकमुळे रविवारी होणाऱ्या असुविधेमध्ये कमी येईल.
आत्मनिर्भर भारतामध्ये मुंबईचे जास्तीत जास्त योगदान वाढावे, यासाठी या शहरात अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशिल असल्याचं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. शिवजयंतीच्या एक दिवस अगोदर मुंबईकरांना ही सरप्राईज भेट देण्यात आली आहे. नवी मार्गिका सुरु झाल्याने मुंबईच्या विकासाला अधिक गती मिळणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे काम करतांना अडचणींचा सामना करीत राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगत एका अर्थाने ‘दिवा’स्वप्न पूर्ण झाल्याची भावना यावेळी व्यक्त केली. नवी मार्गिका सुरु झाल्याने मध्य रेल्वेवर ३६ नव्या लोकल गाड्या धावणार आहेत. ज्या मुंबई करांसाठी नक्कीच फायदेशीर ठरतील.