शहरातील साळवी स्टॉप येथील अनधिकृत बांधकामावर पालिकेने मंगळवारी (ता. ३०) हातोडा फिरवला. जलतरण तलावाच्या मागच्या बाजूला पालिकेच्या जागेत बेकायदेशीर बारा गाळे आणि एक रॅम्प उभारला होता. पालिकेने तो पोलिस बंदोबस्तात जेसीबीने जमिनदोस्त केले. विशेष म्हणजे गाळे बेकायदेशीर असल्याने त्याला विरोध करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे ते कोणाचे होते, हे स्पष्ट झालेले नाही. शहरातील साळवी स्टॉप येथे मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम झाल्यामुळे तेथील अनधिकृत बांधकामे हटली होती; परंतु मार्गाच्या सीमा निश्चित झाल्यानंतर काही स्थानिकांनी पुढाऱ्यांना हाताशी धरून पुन्हा मार्गाच्या सीमेबाहेर पालिकेच्या जागेवर पुन्हा बेकायदेशीर गाळे उभारले. एक दोन नव्हे, तर १२ गाळे असून एक रॅम्प उभारण्यात आला आहे. कोणतीही परवानगी नसताना हे बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले होते.
याबाबत पालिकेने संबंधितांना नोटिसा बजावून बेकायदेशीर बांधकाम हटविण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पालिकेने आज पोलिस बंदोस्त घेऊन हे बांधकाम हटविण्यासाठी मालमत्ता आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक मोहीम आखलीजेसीबी आणून आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. १२ गाळे जेसीबीने जमीनदोस्त केले, तर रॅम्प देखील हटविण्यात आला. मोठ्या प्रमाणात बांधकाम करून देखील कारवाई दरम्यान कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे पालिकेने या मोहिमेत सर्व अनधिकृत बांधकाम हटवले.