26.7 C
Ratnagiri
Wednesday, July 30, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeRatnagiriलाखांच्या कामासाठी पालिकेने मोजले दीड कोटी - शीळ धरण

लाखांच्या कामासाठी पालिकेने मोजले दीड कोटी – शीळ धरण

१० ते १२ लाख या फ्लोटिंग पंपांचे वीजबिल आहे.

शीळ धरण ते जॅकवेलपर्यंतची सुमारे ५४ लाखांची साडेसहाशे मीटरची पाईपलाईन टाकण्यास ठेकेदाराकडून दिरंगाई झाली आहे. त्याचा फटका पालिकेला सहन करावा लागणार आहे. त्यावर पर्याय म्हणून तयार करण्यात आलेल्या ६ फ्लोटिंग पंपांद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे; परंतु या पंपांच्या वीजबिलापोटी महिन्याला १० ते १२ लाख रुपये मोजावे लागत आहे. वर्षाचा विचार केला तर ५४ लाखांच्या कामासाठी पालिकेने दीड कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला, या म्हणीप्रमाणे पालिकेच्या भोंगळ नियोजनाचे हे एक उदाहरण आहे. पालिकेच्या पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता हे सत्य बाहेर आले. पालिकेला आता जाग आली असून, तीन-चार दिवसांत पुन्हा हे रखडलेले पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. शीळ जॅकवेल कोसळल्यामुळे शहरातील पाणीप्रश्न निर्माण झाला होता. त्यावर तात्पुरता पर्याय म्हणून फ्लोटिंग पंप बसवण्यात आले आहेत.

सुधारित पाणीयोजनेमध्ये शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत सुमारे साडेसहाशे मीटरच्या पाईपलाईनचा समावेश आहे; परंतु वर्ष झाले तरी ही पाईपलाईन टाकण्याच्यादृष्टीने अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत. गेल्या पावसाळ्यापूर्वी पाईपलाईन टाकण्याचे काम अर्धवट झाले होते; परंतु मुसळधार पावसाळ्यात टाकण्यात आलेले हे पाईप वाहून गेले. त्यामुळे पालिकेचे मोठे नुकसान झाले. सुमारे ५४ लाखांचे हे काम होते. त्यानंतरही दुसरा पावसाळा नाही; मात्र या ५४ कोटींच्या कामसाठी वर्षभर सुमारे दीड कोटी पालिकेने मोजले आहेत. पालिकेला आता तर उपरती सुचावी आणि भविष्यातील हा वायफळ खर्च टाळण्यासाठी लवकरात लवकर नैसर्गिक उतारासाठी शीळ धरण ते जॅकवेलपर्यंतची पाईपलाईन टाकावी, अशी मागणी आहे.

नऊ पंपांचे २९ लाखांचे वीजबिल – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साळवी स्टॉप जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी उचलण्यासाठी अडीचशे अश्वशक्तीचे ३ पंप बसवण्यात आले आहेत तर नैसर्गिक उतारासाठी पाईपलाईन न टाकल्यामुळे नदीवर ६ फ्लोटिंग पंप बसवण्यात आले आहेत. या ९ विद्युतपंपांचे महिन्याला सुमारे २९ लाख रुपये वीजबिल पालिकेला भरावे लागत आहेत. त्यापैकी सुमारे १० ते १२ लाख या फ्लोटिंग पंपांचे वीजबिल आहे. मग ५४ लाखांच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा सुमारे दीड कोटीचा फटका पालिकेला बसला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular