26.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeRatnagiriमुथ्थुट फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केला लाखोंचा अपहार

मुथ्थुट फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केला लाखोंचा अपहार

५ कर्मचाऱ्यांनी २६ लाख ८१ हजार रुपयांचा अपहार केला आहे.

लांजा येथील मुथ्थुट फायनान्स कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांनी संगनमताने एकूण २६ लाख ८१ हजार रुपयांचा अपहार करून संस्थेची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली या कंपनीच्या ५ कर्मचाऱ्यांवर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हे वृत्त कळताच लांजामध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत लांजा पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, लांजा येथील मुथ्थुट फायनान्स कंपनीचे क्लस्टर मॅनेजर संजय चुडाजी राऊळ (४४ वर्षे, रा. वेर्ले तळेवाडी ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) यांनी याबाबत लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. कंपनीच्या ५ कर्मचाऱ्यांनी एकूण २६ लाख ८१ हजार रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करणारी तक्रार दाखल केली आहे. मुथ्थुट फायनान्सच्या लांजा शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम करणारे सुनील तुकाराम गुरव (५४ वर्षे, मुळगाव करूळ ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग, सध्या राहणार कनावजेवाडी ता. लांजा जि. रत्नागिरी), जूनियर रिलेशन एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणारे प्रसाद सिताराम रामाणे (२८ वर्षे, राहणार लांजा आगरवाडी जि. रत्नागिरी), रोखपाल व ज्युनिअर रिलेशन एक्झिक्यूटिव्ह सुशांत सुनील धाडवे (२७ वर्षे, राहणार पाथरट पाली जि. रत्नागिरी), ओंकार दिवाकर थारळी (२६ वर्षे, राहणार मोगरे राजवाडी ता. राजापूर जि. रत्नागिरी) आणि जुनियर रिलेशन एक्झिक्यूटिव्ह तुषार गजानन वाडेकर (२७ वर्षे, राहणार लांजा खावडकरवाडी) अशी या ५ संशयित आरोपींची नावे आहेत, असे पोलीसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

तब्बल २६ लाखांचा अपहार – या पाचही जणांनी दि. २४ जून २०२४ ते दि. ०५ मे २०२५ कालावधीत कंपनीचे कर्मचारी गैरफायदा उठवित असल्याचा मुथ्थुट फायनान्स कंपनी लांजा येथे खातेदारांच्या तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये एकमेकांच्या संगनमताने छेडछाड करून अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सोन्याचे दागिने बदली करून सोन्याचा चालू बाजार भावाप्रमाणे एकूण सोने २७३.७ ग्रॅमचा एकूण रुपये २३ लाख ९६ हजार व मुथ्थुट कंपनीची परवानगी न घेता साथीदार महिलेला त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात २ लाख ८५ हजार रुपये देवून एकूण २६ लाख ८१ हजार रुपयांचा अपहार करून मुथ्थुट फायनान्स कंपनीची आर्थिक फसवणूक केली असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

लांज्यात खळबळ – गेल्या काही महिन्यांपासून लांजा येथील मुथ्थुट फायनान्स कंपनीत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा लांजा शहरात सुरू होती. त्यानंतर कंपनीचे जनरल मॅनेजर किरण यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे लांजा पोलीस ठाण्यात झालेल्या तक्रानुसार लांजा पोलिसांनी वरील पाचही कर्मचाऱ्यांवर लांजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६ (५), ३१८ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अमोल सरंगळे हे करत आहेत.

पोलीसांचे आवाहन – मुथ्थुट फायनान्स लांजा शाखेतील उघड झालेल्या कथित अपहारासंदर्भात लांजा तालुक्यातील आणखीन कोणत्या नागरिकांची मुथ्थुट फायनान्स लांजा शाखेत फसवणूक झाली असेल तर, याबाबत त्यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular