वसईतील मच्छिमारांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, ६६ नॉर्टिकल अंतरावर मागील १० दिवसांपासून समुद्रात गोल रिंगण तयार झाल्याचे दिसून आलं आहे. गोल रिंगण म्हणजे जणू काही भोवरा असावा असे सांगण्यात येत आहे. मासेमारी करुन किनाऱ्याकडे परत येताना वसईच्या स्थानिक मच्छीमारांना हे रिंगण दिसलं. त्यामुळे मच्छीमार बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वसईतील एक बोट याच गोल रिंगणामध्ये अडकली होती. मात्र सुदैवाने ती बोट त्या रिंगणामधून बाहेर पडली. त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पाण्याच्या हालचाली – समुद्रातील इतर ठिकाणचे पाणी शांत असतानाच या ठराविक वर्तुळामध्येच पाणी असं रहस्यमयरित्या का हालचाल करत आहे? याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र मच्छिमार बांधवांकडून या ठिकाणी पाण्याखाली ज्वालामुखी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
२०० हून अधिक सौम्य भूकंप – पालघर जिल्हा हा भूकंपप्रवण क्षेत्र आहे. दरवर्षी इथं २०० हून अधिक सौम्य भूकंप होतात म्हणून आपत्ती विभागाकडूनही तपासणी करावी अशी मागणी समुद्र जीवरक्षक जनार्दन मेहेर यांनी केली आहे.
जहाजं गिळतं? – हे रिंगण आकाराने फारच लहान असून यामध्ये जहाजं गिळण्याइतकी क्षमता नाही. तरीही या ठिकाणावरुन बोटी नेणं टाळावं असं सुचवलं जातं. मुळात हे का होत आहे याचं कारण समोर आलेलं नाही. त्यामुळेच त्याच्या ताकदीची चाचपणी करण्याचं भलतं साहस करु नये हेच योग्य ठरेल असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
कारण काय? – या प्रकाराच्या संभाव्य कारणांविषयी काही जाणकारांनी व्यक्त केलेल्या मतांनुसार भूकंपासारख्या क्रियांमुळे हे पाणी असं हलत असेल. गॅस पाइपलाइनशी संबंधित गळती किंवा उत्सर्जन झाल्याने असं रिंगण तयार झालं असेल असही सांगितले जाते. मात्र, हे रिंगण नेमके कशामुळे तयार झालं याचा नेमका खुलासा अद्यापही झालेला नाही. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. प्रशासन आणि नौदल तपास य प्रकरणाचा तपास करत आहे.
सामान्यपणे अशा वेळी घडतं काय? – समुद्रात असे रिंगण किंवा गोलाकार प्रवाह तयार होण्याचे मुख्य कारणांमध्ये समुद्री प्रवाह आणि लाटांची हालचाल हे असू शकतं. समुद्रातील भरती-ओहोटी किंवा वाऱ्यामुळे पाणी गोलाकार फिरू लागते. याला ‘एडीज’ म्हणतात. अशा वर्तुळांना मेसोस्केल रिंग्स म्हणूनही ओळखले जाते. असे पाण्याची रिंगणं कधी गरम किंवा थंड असू शकतात. काही ठिकाणी ही रिंगणं शेकडो किलोमीटर व्यासाचीही असतात. समुद्राच्या तळाशी भूकंप, ज्वालामुखी किंवा गॅस उत्सर्जन झाल्यास पाण्यात गोलाकार भोवरे तयार होऊ शकतात. यामुळे पाणी वर येऊन वर्तुळाकार आकारामध्ये उकळत असल्यासारखं हलत राहतं. जोरदार वारे किंवा चक्रीवादळामुळे समुद्राच्या पृष्ठभागावर गोलाकार प्रवाह तयार होतात. याम धूनही पाण्याची रिंगणं तयार होतात.

