चिपळूण नदी गाळ उपस्याचे काम वेगवान गतीने सुरु करण्यात आले असून, सर्व यंत्रसामग्री सुद्धा चांगल्या प्रकारे काम करत आहे. नाना पाटेकर यांची नाम संस्थेद्वारे नद्या गाळमुक्त करण्यासाठी चिपळूणमध्ये काम सुरु आहे. कामथे धरणापासून बाजारपेठेपर्यंत शिवनदी मोकळी करण्यासाठी तब्बल चार पोकलेन कार्यान्वित झाले आहेत. नाम संस्थेकडून आणखी एक पोकलेन दाखल झाला आहे. त्यामुळे कामाला अजूनच गती प्राप्त झाली आहे.
नाम फाऊंडेशनच्यावतीने या कामाचा शुभारंभ झाल्यानंतर अजून एक पोकलेन या मोहिमेत सामील झाला. या मशिनने कामाचा शुभारंभ चिपळूण तहसिलदार जयराज सुर्यवंशी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे व जलसंपदा विभागाचे अधिकारी खोत, ग्रामपंचायत कामथेचे सरपंच सुनिल गोरीवले व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. येत्या काही दिवसातच कामथे धरणाच्या पुढील बाजूस नदीपात्र गाळमुक्त होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. कामथे धरणातील परिसरात गाळ काढण्याच्या कामाला चांगलीच गती मिळाली आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज चिपळूण पेठमाप येथे सुरू असलेल्या वाशिष्ठी नदीच्या तसेच पागमळा चिपळूण येथे सुरु असलेल्या शिव नदी गाळ काढण्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला. यावेळी चिपळूणचे प्रांत अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, सचिन कदम आदी संबंधित विभागाचे अधिकारी व येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
चिपळूणवासियांचे जुलै २०२१ मध्ये उद्भवलेल्या महापुराच्या परिस्थितीमुळे खूपच अवस्था गंभीर झाली. नदीचा गाळ कित्येक वर्षे न उपसल्यामुळेच हि पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली, आणि ती पुन्हा कधी होऊ नये यासाठी गाळ उपसा करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे.