चिपळूणमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली महापूराची परिस्थिती खूपच भयंकर होती. हि परिस्थिती का उद्भवली याचे कारण शोधता, अनेक वर्षे तेथील नद्यांमधील गाळाचा उपसाच न केल्याने, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण झाले. आणि त्याचेच रुपांतर महापुराने घेतले. त्यामुळे आलेल्या या महापुरामध्ये अनेकांचे संसार उध्वस्त झाले. अनेकांची घरे पाण्याखाली गेली. घरातील सामान सर्व वाहून गेले. कागदपत्रे वाहून गेली. त्यामुळे शासनाकडून मिळणारी मदत मिळायला सुद्धा विलंब झाला.
चिपळूण मध्ये उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता, नाम फाउंडेशनने नद्यांमधील गाळ उपसा करण्यासाठी पुढाकार घेतला. वाशिष्ठी नदीमधील उक्ताड बेटाचा गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ शनिवारी आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाला. शिवनदी पाठोपाठ हे काम देखील सुरू केल्याबद्दल आमदार शेखर निकम यांनी नाम फाउंडेशनचे आभार मानत आपण सर्वांनी आता लोकसहभागातून नामला सहकार्य करू या आर्थिक भार उचलू या, असं आवाहन केले.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यावतीने गाळ स्थलांतरित करण्यासाठी दोन डंपर सुपूर्द करण्यात आले. या डंपरमुळे काढलेला गाळ प्रशासनाने दिलेल्या जागेत स्थलांतरित करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. अशाच प्रकारे इतर संघटना, लोकप्रतिनिधी बांधकाम व्यावसायिक आणि सामाजिक संस्थांनी एक पाऊल पुढे येऊन डंपरची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जेणेकरून काढलेल्या गाळाची योग्य वेळी आणि ठिकाणी निचरा करता येईल.
अवघ्या एका महिन्यात एक लाख घनमीटरपेक्षा जास्त गाळ काढून झाला आहे. चिपळूण पूरमुक्त करण्यासाठी नाम फाउंडेशनतर्फे लागेल तितकी मशिनरी मिळेल, असा शब्द नाना पाटेकर यांनी चिपळूणवासियांना दिला होता. चिपळूणकरांनीही खारीचा वाटा उचलावा, असं नामच्या संचालिका शुभदा महाजन यांनी आवाहन केले आहे.