शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत लहान मोठ्या चोऱ्यांचे सत्र राजरोस सुरूच आहे. चोरट्यांनी सहकारनगर नाचणे येथील डॉक्टरांच्या घराचे खिडकीचे गज हत्याराने कापून घरात शिरकाव करून सोने-चांदीचे दागिने व रोख रकमेसह एकूण १ लाख ६७ हजार ९०० मुद्देमाल लंपास केला आहे. चोरांचा माग काढणे म्हणजे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे. मात्र शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सकाळी साडेआठ ते सोमवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, डॉ. ताराचंद सीताराम पुजारी वय ७२, सहकारनगर, नाचणे रत्नागिरी हे मुंबईला मुलाकडे राहायला गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी या संधीचा फायदा घेऊन यांच्या घराच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज धारदार हत्याराने कापून, बाहेरील बाजूला वाकवून घरामध्ये प्रवेश केला.
घरातील बेडरूममधील कपाटातील ४८ हजार रोकड व १ लाख १९ हजार किमतीचे सोन्याचे दागिने असा सुमारे १ लाख ६७ हजार ९०० रुपये चोरट्यानी चोरून नेले. या प्रकरणी डॉ. पुजारी यांनी मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक महाले करत आहेत. या चोरीबाबत शहर पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे. शहर व ग्रामीण भागात वाढत जाणाऱ्या या चोऱ्यांच्या सत्राला आळा घालण्यासाठी पोलिसांना कंबर कसावी लागणार आहे. अशा प्रकारच्या चोऱ्यांना रोखण्यासाठी विविध उपाययोजना पोलीस यंत्रणा अवलंबवत आहे. अद्ययावत यंत्रणेचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे.