नागालॅण्डमधील मोन जिल्ह्य़ात सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये शनिवारी रात्री सहा खाण मजुरांसह १४ नागरिक ठार झाले, तर ११ हून अधिक जखमी झाले. त्यानंतर उसळलेल्या दंगलीत एका जवानाचा मृत्यू ओढवला आहे.
शनिवारी संध्याकाळी गोळीबाराची पहिली घटना जवानांच्या गैरसमजातून घडल्याचे म्हटले जात आहे. काही खाण मजूर एका वाहनातून गाणी गात घरी जात होते. ते मजूर म्हणजे ‘नॅशनल सोश्ॉलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालॅण्डच्या युंग आँग गटाचे बंडखोर असल्याचा समज करून सुरक्षा जवानांनी त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली, त्यामध्ये सहा मजूर ठार झाले.
काही स्थानिक तरुण आणि ग्रामस्थ कामगार घरी परतले नसल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी जात असताना त्यांना लष्करी वाहनांनी घेरले. त्यानंतर ग्रामस्थ आणि जवान यांच्यात झालेल्या दंगलीमध्ये एका जवानाचा मृत्यू झाला. त्यावेळी जवानांनी ग्रामस्थांवर प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यामध्ये आणखी सात नागरिकांचा नाहक बळी गेल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. जवानांनी हा गोळीबार स्वसंरक्षणासाठी केल्याची पुस्तीही पोलिसांनी जोडली.
या घटनांनंतर नागालॅण्ड सरकारने एका अधिसूचनेद्वारे प्रक्षोभक चित्रफिती, छायाचित्रे किंवा मजकूर समाजमाध्यमांवरून प्रसारित होऊ नये यासाठी मोन जिल्ह्यात मोबाइल, इंटरनेट सेवा आणि मोठय़ा प्रमाणात लघु संदेश पाठवण्यावर बंदी घातली आहे.
लष्कराच्या या घटनेमुळे सर्व जगभरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या. त्याचप्रमाणे न्यायालयीन चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत. या घटनांमध्ये लष्कराच्या एका जवानाचा मृत्यू झाला असून काही जवान गंभीर जखमी झाले आहेत. घडलेली घटना आणि त्याचे परिणाम हे अतिशय खेदजनक असून, या घटनांमधील जीवितहानीची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येत असल्याचे लष्कराने स्पष्ट केले.