लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र नसलेल्या महिलांनीही घेतल्याची बाब उघड झाल्यानंतर चिपळूण तालुक्यातील संशयित लाभार्थी महिलांची यादी पडताळणी करिता महिला व बालविकास विभागाला देण्यात आली होती. ही पडताळणी पूर्ण झाली असून, त्याबाबतचा अहवाल राज्यशासनाला सादर करण्यात आला आहे; मात्र किती महिलांची नावे वगळण्यात आली, हे गुलदस्त्यात आहे. कौंढरताम्हाणे येथील एका महिलेने तिच्या नावे चारचाकी असल्यामुळे या योजनेतून तिला अपात्र ठरवण्यात आल्याचा दावा केला आहे. या संदर्भात एकात्मिक बालविकास सेवा केंद्र चिपळूण येथे संपर्क केल्यानंतर संबंधित महिलेच्या नावे गाडी नाही; परंतु ती संजय गांधी निराधार योजनेची लाभार्थी असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे तिला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही. याबाबत एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रकल्प प्रमुख सुनीता नाईकवडी म्हणाल्या, महिलांचा आर्थिक स्तर सुधारावा, त्यांना आरोग्य व पोषणाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी महायुती सरकारच्यावतीने लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली; मात्र, योजना सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनंतर या महिलांची पात्र-अपात्रतेची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यात महिलांचे रेशनकार्ड तपासून एकाच कुटुंबात दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतला असल्यास, त्यांचे पत्ते व लाभार्थी मोबाइल नंबरवर फोन करून त्यांची माहिती घेण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली होती. त्यानुसार आम्ही पारदर्शकपणे पडताळणी केली. स्थानिक पातळीवर अंगणवाडी सेविकांना महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या पडताळणीला अंगणवाडी सेविकांनी नकार दिला होता. तरीही आम्ही त्यांची समजूत काढली आणि केवळ अहवाल द्या, असे सांगितले. त्यानुसार तालुक्यातील ४५ हजार महिलांचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आला आहे. त्यातून किती महिलांची नावे वगळण्यात आली, हे आम्हाला माहिती नाही.
अनेकांना चिंता… – लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीची पडताळणी चिपळूण तालुक्यात पूर्ण झाली आहे. अपात्र लाभार्थीचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे अशा अपात्र यादीत आपले नाव आहे, का याची चिंता अनेक लाडक्या बहिणींना लागून राहिली आहे.