कोकण दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने शुकवारी सांयकाळी राजापूर मध्ये दाखल झालेले. त्यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी राजापूर तालुक्यातील बहुचर्चित नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत सूचक विधान केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राजापूरात घेतलेल्या पत्रकार परीषदेमध्ये नाणार रिफायनरी प्रकल्प होणारच असे ठणकावून सांगितले.
राजापूरमध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक असलेला रिफायनरी प्रकल्प झाल्याने एक अत्याधुनिक आणि अद्ययावत शहराची निर्मिती होणार आहे. येथे हायटेक शाळा, कॉलेज, हॉस्पिटल उपलब्ध होऊ शकणार आहेत. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वांनी रिफायनरी प्रकल्पाच्या बाजूने उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनेनुसार मी जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या समस्या, प्रश्न जाणून घेऊन त्यावर निश्चितच तोडगा काढू, त्याचप्रमाणे जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे ना.राणे यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, तरूण-तरूणींनी नोकरीच्या शोधात राहण्यापेक्षा उद्योजक व्हावे, रोजगार शोधण्यापेक्षा स्वत: रोजगार निर्माण करावा, मालक व्हा आणि आपल्या बांधवांना त्या ठिकाणी रोजगार द्या. दरडोई उत्पन्नमध्ये वाढ कशी होईल यासाठी अनेक उपाययोजना शासनाकडे उपलब्ध आहेत. या योजनांकरीता लागणारा निधी तसेच मार्गदर्शन शासनाकडून मिळवून देण्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही ना.राणे यांनी यावेळी दिली.
तसेच लवकरच जिल्ह्यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू होईल. जिथे उद्योगासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन मिळणार आहे. उद्योगाविषयी असणाऱ्या सर्व समस्या, शंकाकुशंकांचे येथे निरसन करण्यात येणार आहे.