कालपासून सुरु झालेल्या जन आशीर्वाद यात्रेचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईमध्ये बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून केले. राणेंनी आधीच जाहीर केले होते कि, दादरला बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन पुढे यात्रेला सुरुवात करणार, पण काही शिवसैनिकांनी आम्ही इथपर्यंत पोहचू देणार नाही अशा वल्गना केल्या होत्या. राणे शिवतीर्थावर अभिवादन करून गेल्यानंतर काही शिवसैनिक त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी थेट दुग्धाभिषेक आणि गोमुत्राने त्या जागेचे शुद्धीकरण केले. शुद्धीकरण केल्यानंतर फुलेही वाहण्यात आली. सदर प्रकारानंतर नारायण राणे चांगलेच संतापल्याने, त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळ शुद्धीकरणावरुन नारायण राणे यांनी संताप व्यक्त करत म्हटले कि, हे उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीमधील सगळ्यात उत्तम काम आहे. शुद्धीकरण करताना उपस्थित असलेल्या आप्पा पाटील यांनी प्रतिक्रिया देताना राणेंना सडेतोड टोला लगावला आहे. ते म्हणाले की, इतक्या वर्षात त्यांना बाळासाहेब दिसले नव्हते, त्यांना आज शिवसेना दिसून आली. आमची पवित्र वास्तू अपवित्र झाल्याने दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केले, तसेच बाळासाहेबांनी आवडणारी चाफ्याची फुले त्या ठिकाणी वाहिली आहेत.
शिवसैनिकांच्या या कृत्यावर नारायण राणे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वत:चं शुद्धीकरण करण्याचा खोचक सल्ला दिला आहे. आणि ठणकावून सांगितले कि, प्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं, नंतर शिवाजी पार्कवर वीर सावरकर स्मारक आणि बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर मी नतमस्तक झालो. मी आज जे आहे ते बाळासाहेबांमुळेच आणि आज बाळासाहेब असते तर त्यांनी मला शुभाशिर्वादच दिले असते.