रत्नागिरीतील नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान सर्व परिचित आहे. संकटकाळी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान मदतीसाठी कायम तत्पर असते. या कोरोनाच्या महामारी काळामध्ये सुद्धा संस्थान मदतीसाठी पुढे सरसावले आहे. कोरोना काळामध्ये संस्थानाने केलेली मदत नक्कीच आदर्श घेण्यासारखी आहे.
नाणीज गावामध्ये ग्रामपंचायतीने शासनाच्या कोरोनामुक्त गाव, माझे गाव-माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषद शाळा क्र. १ मध्ये कोरोना विलगीकरण कक्ष निर्मिती केली आहे. त्या कक्षाच्या स्थापनेसाठी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाने सर्वतोपरी मदत केली आहे. संस्थानातर्फे या विलगीकरण कक्षाला १५ बेड, पाण्याच्या टाक्या, रुग्णांच्या जेवणासाठी ताटे, वाटी, पेले इत्यादी गरजेच्या साहित्यचा पुरवठा केला आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नाणीज गावामध्ये सुरु करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलताना म्हणाले, वेळोवेळी येणाऱ्या संकटकाळात संस्थानाचे कार्य चांगलेच आहे. कोरोना काळात संस्थानाने केलेली आर्थिक मदत, आरोग्य सेवेचे व रुग्णवाहिकांचे काम खूपच गौरवास्पद आहे. कोरोनाच्या संकटकाळात संस्थानाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५० लाख रुपये, पंतप्रधान सहाय्यता निधीला ५२ लाख रुपये, रत्नागिरी प्रशासनाला १५ लाख रुपये, रत्नागिरी पोलीस यंत्रणेला १० लाख रुपये अशा प्रकारची १ कोटी २७ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
सदर नाणीज गावातील विलागीकरण कक्ष उद्घाटन प्रसंगी नाणीजचे सरपंच गौरव संसारे, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद भागवत व राजन बोडेकर, उपसरपंच राधिका शिंदे, तलाठी मेस्त्री, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती परशुराम कदम, महेश म्हाप आदी उपस्थित होते.