कोकणात यायचं म्हणजे खड्डे चुकवाचुकवी करून यायचं, हे ब्रीदवाक्य सध्या सगळ्यांच्या मुखी आहे. खड्डे चुकवून जर तुम्ही सुखरूप घरी पोहोचलेत तर खरे कोकणकर. महामार्गांची झालेली दुरावस्था लक्षात घेता, सोशल मिडीयावर अनेक मेमेज, फोटो, व्हिडियो शेअर केले जात आहेत. अनेक प्रकारे रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेवर नाराजगी व्यक्त करून अनेक प्रकारे खिल्ली उडवली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील ठिकठिकाणी सुरु असलेल चौपदरीकरणाचं काम गेली दहा वर्षांपासून अधिकतम काळ रखडलेलं आहे. त्यासोबतच जागोजागी पडलेल्या लहान मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशा चाळण झाली आहे. त्यामध्ये आत्ता पावसाळा सुरू झाल्याने, महामार्गाची अवस्था दयनीय झाली असून सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनचालकांना विनाकारण अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
खोपी फाट्यापासून ते भोस्ते घाटातील काही अंतरापर्यंत चौपदरीकरणाचे काम अर्धवट करण्यात आले आहे. त्यामुळे खोदकाम केलेली सर्व माती, रस्त्यावर आल्याने, संपूर्ण महामार्गावर दलदल निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. त्याच्यातून मार्ग काढताना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महामार्गाची स्थिती खूपच दयनीय असून, त्यावर असलेले खड्ड्यांचे साम्राज्य आणि सुरु झालेला पावसाळा त्यामुळे वाहनांचे अपघात होऊन एखाद्याचा जीव जाऊ शकतो, तेंव्हा शासनाला जाग येणार का?
कंपनीचे ठेकेदारसुद्धा अनेकदा बजावून सुद्धा खड्डे बुजवण्याची तसदी घेत नाहीत. त्यामुळे महामार्गावरून वाहतूक करणे म्हणजे सकाळी घरातून बाहेर पडलेली व्यक्ती, कशा रुपात परत येईल, याची काहीही शास्वती देता येत नाही. सध्या भोस्ते घाटातील रस्त्यावरची वाहतूक अंतर्गत दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आली असून, दुसर्या मार्गाने वाहतूक सुरु केली गेली आहे.